संग्रहित छायाचित्र
आकुर्डी ते चिखली रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या रस्त्यावर सकाळपासून रात्री १२ पर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, महापालिकेत चिखलीचा समावेश झाल्यापासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साने चौक ते चिखली चौक या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता विकसित करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र स्वराज पक्षाच्या वतीने दिला आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आकुर्डी ते चिखली या रस्त्यावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. चिखली गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून विविध रस्ते, पाणी, अतिक्रमण अशा विविध प्रश्नांनी या गावाचा विकास खुंटला आहे. शहरातील काही भाग स्मार्ट सिटीने विकसित केले आहेत, पण चिखली हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.
साने चौक ते चिखली चौक दरम्यानचे रस्ता रुंदीकरण केलेले नाही. हा रस्ता तब्बल १२५ फूट मंजूर असूनही या रस्त्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष झाले आहे. या परिसराचा विकास जाणीवपूर्वक खुंटला आहे. संबंधित रस्ता परिसरातील रहदारीचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. अतिक्रमण न काढल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अत्यावश्यक सेवा देखील येथे वेळेवर पोहोचू शकत नाहीत. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, महापालिकेकडून एकाच भागात विकास कामे केली जात आहेत. मात्र, चिखली हे गाव पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. शहरातील करसंकलन कार्यालयात कोट्यवधी रुपयांचा कर चिखलीतील नागरिक देतात, पण विकास कामांच्या नावाने शिमगा आहे. महापालिकेचे आयुक्त हे पक्षपाती निर्णय घेऊन चिखलीला विकासापासून वंचित ठेवत आहेत, असा आरोप येथील नागरिक करू लागले आहेत.
साने चौक ते चिखली या रस्त्याचे रुंदीकरण तत्काळ करावे, विकास आराखड्यातील मंजूर असलेला रस्ता निविदा न काढता प्रलंबित ठेवला आहे. रुंदीकरण न झाल्याने सामान्य नागरिकांसह चिखलीकरांचे हाल होत आहेत. या प्रश्नावर तत्काळ तोडगा न काढल्यास स्वराज पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
- विजू जरे, स्वराज पक्ष