Pimpri Chinchwad: झाडांच्या मुळावर उठलंय कोण?
(विकास शिंदे)
पिंपरी चिंचवड: व्यवसायासह दुकानांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या मुळावर अॅसिडसदृश केमिकल्स टाकत अज्ञातांकडून झाडांवर कु-हाड चालविण्यात येऊ लागली आहे. मागील तीन महिन्यात चिंचवडच्या पीएमपी बस डेपो ते गावडे पेट्रोलियम रस्त्यावरील १० ते १५ झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. (Pimpri Chinchwad News)
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांच्या मुळावर कोण उठलंय, असा सवाल पिंपरी-चिंचवडमधील जागरूक नागरिक उपस्थित करत आहे. झाडांच्या मुळावर अॅसिडसदृश केमिकल्स टाकणा-यांवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे. या सर्व प्रकाराकडे महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागाने दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेने भाटनगर येथील गावडे पेट्रोलियम ते चिंचवडच्या पीएमपी बस डेपोपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करत रस्त्यांचे काम केलेले आहे. प्रशस्त फुटपाथ, नागरिकांना बैठक व्यवस्था, पथदिवे, सायकल ट्रॅक, टू व्हिलर पार्किंग, फोर व्हिलर पार्किंग करत या रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. तसेच रस्त्यांच्या दुभाजकात फुलांची झाडे, दोन्ही बाजूला शहर सौंदर्यात भर टाकणारे वृक्ष लावण्यात आले होते.
महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागाने रस्ते दुभाजक आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पाच ते सात फुटांची देशी झाडे लावली होती. त्यामुळे रस्त्यांच्या सौदर्यात भर पडली होती. मागील दीड वर्षात झाडांचे योग्य संगोपन होवून झाडांची वाढदेखील चांगल्याप्रकारे झाली होती. रस्त्यांच्या दुर्तफा असलेल्या या झाडांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली होती.
मात्र, महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागाने लावलेली झाडे अनेकांना अडथळा ठरू लागली. त्या झाडांमुळे अनेकांना फुटपाथवर व्यवसाय करता येत नव्हता. काहीच्या दुकानांच्या पाट्या दिसत नव्हता. काहींना वाहन पार्क करताना अडचणी येत होत्या. अशाप्रकारे अनेकांना झाडांचा अडथळा येऊ लागला होता. परिणामत: मागील तीन महिन्यांत अचानक एक-एक झाड पूर्णपणे जळून खाक होऊ लागले होते. अगोदर हिरवेगार असलेल्या झाडांची पाने अचानक पिवळी पडू लागली. त्या झाडांची पानगळ सुरू झाली होती. त्यानंतर १५ दिवसांत संपूर्ण झाड वाळलेल्या स्थितीत दिसू लागले.
या झाडांची काही वृक्षप्रेमी नागरिकांनी योग्य पाहणी व निरीक्षण केल्यानंतर कोणीतरी झाडांच्या मुळांवर अॅसिडसदृश केमिकल्स टाकत असल्याने निदर्शनास आले. ते केमिकल्स टाकल्यानंतर झाड हळूहळू जळून पूर्णपणे सुकून जात होते. चिंचवड बस डेपो ते गावडे पेट्रोल पंपापर्यंत रस्त्यालगत लावलेल्या दहा ते पंधरा झाडांवर असा प्रयोग झाला आहे. झाड वाळले की, काही जण हे झाडांच्या मुळावर कु-हारीचे घाव घालून ते झाड काढून टाकत होते.
महापालिकेच्या सारथीवर या प्रकरणाची ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे उद्यान विभागातील अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे. महापालिका कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्याचे सुशोभीकरण करते. त्याअंतर्गत लावलेल्या झाडांवर मुळावर अॅसिडसदृश केमिकल्स वापरून अज्ञात लोकांकडून १० ते १५ झाडे तोडली जात आहेत. तरीदेखील उद्यान विभागाचे अधिकारी या तक्रारीकडे गंभीरपणे बघत नसल्याचे दिसून येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.