संग्रहित छायाचित्र
मतदानाच्या दिवशी शासकीय व खासगी आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देण्याबाबत शासनाने कळविले आहे. शहरात इतर ठिकाणी कामे करणाऱ्या नागरिकांना देखील संबंधितांनी सुट्टी देऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, या सुट्टीचा उपयोग मतदारांनी मतदानासाठी करून आपला मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
शहरात भव्य मतदार जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आयुक्त सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत बाईक रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, पालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, युथ आयकॉन उपक्रमातील स्पर्धक यांच्यासह विविध भागातून आलेले सुमारे ३५० पेक्षा अधिक बाईक रायडर्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित्त होते. निवडणूक आयोगाने मतदानासाठी बुधवार,दि २० नोव्हेंबर २०२४ हा सलग सुट्टी नसलेला दिवस निवडला आहे. सुट्टीचा उपयोग इतर कामासाठी न करता मतदानासाठीच सुट्टीचा वापर व्हावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले.
दरम्यान, निगडी येथील भक्ती शक्ती चौकात जीएनडी ग्रुप च्या बाल कलाकारांनी मतदार जनजागृतीपर नृत्य सादरीकरण केले. या कलाकारांनी आपल्या मनमोहक, चित्तथरारक व प्रबोधनात्मक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आयुक्त सिंह यांनी देखील यावेळी बालकलाकारांचे कौतुक केले.
मतदार जनजागृती बाईक रॅली
पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी या मतदार जनजागृती बाईक रॅलीने तिनही मतदार संघातील प्रमुख मार्गांवरुन सुमारे ३३ किलोमीटर अंतर पार केले. यावेळी रॅलीद्वारे देण्यात येणारा संदेश ऐकण्यासाठी तसेच रॅली पाहण्यासाठी विविध भागात नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बाईक रॅली लांडेवाडी भोसरी येथे आली असता महापालिकेच्या वतीने उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या रॅलीची सांगता भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.