संग्रहित छायाचित्र
शहरातील स्पाईन रस्त्यासह अन्य भागात रस्त्यावर लावलेल्या झाडांची स्थिती खुपच भयावहक आहे. स्पाईन रस्त्यावर रस्ते दुभाजक साठी लावलेल्या लोखंडी पत्र्यामुळे शेकडो झाडांचा जीव गुदमरला आहे. काही झाडांना खिळे मारलेले, मोठ्या झाडांना चिटकवलेल्या जाहिराती, झाडांची पूर्ण वाढ होऊनही न काढलेल्या संरक्षण जाळ्याने त्या झाडांचा श्वास कोंडला आहे. मात्र, याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाने दुर्लक्ष केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे परिसर पूर्णपणे हिरवागार दिसतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून दरवर्षी हजारो वृक्ष लागवड केली जाते. त्यामुळे वृक्षांना संरक्षण देण्यासाठी विभागाकडून संरक्षण जाळ्या देखील लावण्यात आलेल्या आहेत.
या झाडांची काळजी घेण्याकडे महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे दुर्लक्ष होत आहे.महापालिकेने स्पाईन रस्त्यावर शेकडो झाडे लावलेली आहे. ती झाडे लावताना रस्त्याच्या दुर्तफा आणि मधोमध देखील लावली आहेत. मात्र, आता सगळी झाडे मोठी झाली आहेत. परंतू, रस्त्याला दुभाजक म्हणून लोखंडी पत्रे लावलेले आहेत. त्या लोखंडी दुभाजकांमध्ये शेकडो झाडे अडकली आहेत. अनेक झाडांना लोंखडी पत्र्यामुळे योग्य वाढ होत नाही. त्या झाडांचे बुद्यांवर वाढ योग्य होताना दिसत आहे.
तसेच वृक्ष लागवड करताना संरक्षण म्हणून रोपाभोवती संरक्षण जाळी लावली जाते. मात्र, झाडे मोठी झाली की त्याच जाळ्यांमुळे झाडांना इजा पोहोचत असून, शहरातील अनेक भागात झाडांची संरक्षक जाळ्या तशाच ठेवल्याने झाडांचा श्वास कोंडला जावू लागला आहे. रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे मोठी झालेली आहेत. झाडाच्या बुंद्यामध्ये लोखंडी जाळ्या घुसलेल्या आहेत. काही ठिकाणी जाळ्या तुटलेल्या आहेत. मोठ्या झाडांना आता अशा संरक्षक जाळ्यांची आवश्यकता गरज नाही. तरीही त्या काढल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
खिळे व जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन
शहरात अनधिकृत जाहिरातींचा लावण्याचा नवा फंडा जाहिरातदारांनी शोधला आहे. शहरात झाडांवर मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जात आहेत. त्यामध्ये मोठे फ्लेक्स बांधलेले दिसून येतात. तर छोट्या जाहिराती लावलेल्या असतात. खिळे ठोकून मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे पोस्टर लावलेले दिसतात. याकडे हे महापालिका लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
छोट्या जाहिरातीमुळे झाडांचे विद्रुपीकरण होताना दिसून येते. झाडांना ठोकलेले खिळे वर्षानुवर्षे तशाच अवस्थेत असतात. ते काढून टाकण्यात येत नाहीत. त्यामुळे झाडांना धोका निर्माण होत असला तरी त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. तसेच जाहिराती व खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाईदेखील महापालिकेचा उद्यान विभाग करत नसल्याचे दिसून येत आहे.
लोखंडी जाळ्यांमुळे झाडांची अवस्था बिकट
शहरातील पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, मोशीसह अनेक भागात तारेच्या कुंपण जाळीमुळे अनेक मोठ्या झाडांना इजा पोहोचत आहे. या जाळ्या काढल्या तर झाडांची वाढ योग्य होऊन झाडे मोकळा श्वास घेतील. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडांच्या बुंद्यामध्ये अडकलेल्या लोखंडी जाळ्या त्वरित काढून टाकाव्यात. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.