संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड : शालेय वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असताना, आरटीओ विभागाने शहरांतर्गत तपासणी मोहीम सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली असून, यात १७१ बसचालकांनी मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. या बसचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान ही तपासणी मोहीम अशी सुरू असून, बसचालकाने यापूर्वीच कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात २,९५७ स्कूल बसची नोंदणी आहे. बसव्यतिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही शालेय विद्यार्थांची वाहतूक केली जाते. पुणे शहरात मागच्या आठवड्यात शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडूनच दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. या घटनेनंतर पुन्हा शहरातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ एप्रिल ते ३१ ऑगस्टदरम्यान शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये एकूण २८० प्रवासी बसची तपासणी केली. यात बसचालकांकडून विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, कर न भरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७१ वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली. मात्र शहरात तीन हजार शालेय वाहतूक करणारी वाहने असताना केवळ २८० वाहनांचीच तपासणी केली.
ग्रामीण भागातही राबवणार मोहीम
पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच तळेगाव, लोणावळा, खेड, आंबेगाव, जुन्नर हा ग्रामीण भाग आरटीओमध्ये मोडतो. या परिसरातही मोठ्या प्रमाणात स्कूल बस धावतात. अनेकदा कळवून देखील संबंधित बसचालकांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. अनेक बसचे योग्यता प्रमाणपत्र अपूर्ण आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातही अशा प्रकारची मोहीम राबवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरटीओ विभागाने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणे, कर न भरणे अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७१ वाहनांवर आरटीओच्या सात वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली. मात्र शहरात तीन हजार शालेय वाहतूक करणारी वाहने असताना केवळ २८० वाहनांचीच तपासणी कशी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.