संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो बांधकाम व्यावसायिक हे गृहप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर बांधकाम विभागाकडून भोगवटा दाखला घेतात. त्यानंतर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आथिंक संगणमताने कित्येक वर्ष मालमत्तेची नोंद करत नाहीत. त्यामुळेच महापालिकेचा लाखो रुपये टॅक्स बुडवला जात असल्याचे निदर्शनास येत होते.
त्यामुळे महापालिकेकडून करसंकलनला नवीन संगणक प्रणाली विकसित केली असून मालमत्ता कर चुकवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना चाप लागणार आहे. तसेच करसंकलनच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही मालमत्ताकराची नोंद न करण्यात बांधकाम व्यावसायिकांना टॅक्सची सवलत देणे बंद होणार आहे. शहरातील गृह व व्यापारी इमारतींना महापालिकेकडून बांधकाम परवानगीचा दाखला तसेच भोगवटा दाखला दिला जातो. दाखला देताना सर्व सदनिका व व्यापारी गाळ्यांना आता मालमत्ताकर लावला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने नवीन संगणक प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे नव्याने निर्माण झालेला इमारतींतील सर्व सदनिका व गाळे तात्काळ कर कक्षेत येणार आहेत. परिणामी, महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.
शहरातील अनेक नव्या प्रकल्पातील सदनिका, बंगलो व व्यापारी गाळ्यांची महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे नोंदणी होत आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर बुडतो. हे रोखण्यासाठी महापालिकेने बांधकाम परवानगी व कर संकलन विभागाची संगणक प्रणाली एकमेकांशी जोडून त्या प्रणालीत सुधारणा केली आहे. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाकडून इमारतीस बांधकाम परवानगी तसेच, भाग किंवा पूर्ण भोगवटा दाखला दिला जातो. इमारतीमधील सदनिका, गाळे, पार्किंग, वाहनतळ, बांधकाम क्षेत्र, मजला, सेल डिड तसेच, सदनिकाधारकांचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, मेल आयडीची अशी सर्व माहिती दिल्यानंतर तो दाखला दिला जाणार आहे. रिकाम्या सदनिकांची माहिती विकासकांच्या नावाने नोंदवली जाणार आहे. ही नोंदणी केल्याची तपासणी करूनच कनिष्ठ अभियंता, उपअभियंता किंवा कार्यकारी अभियंता यांच्याकडून भोगवटा दाखला दिला जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे कर संकलन विभागाकडून सर्व सदनिका व गाळ्यांना मालमत्ताधारकांच्या नावाने मालमत्ताकर लावला जाणार आहे. त्यामुळे सदनिकाधारकांची तात्काळ कर संकलन विभागाने नोंद होणार आहे. त्यासाठी नव्याने प्रक्रिया करण्याची गरज सदनिकाधारकांना राहणार नाही.
खरेदी दस्त नोंदणीनंतर पालिकेकडे त्वरित नोंद
मुद्रांक व नोंदणी विभागाकडे सदनिका किंवा गाळ्यांची खरेदी दस्त नोंद केल्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून त्या मालमत्तेवर संबधित व्यक्तीचे नाव लावण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता नोंदणी व हस्तांतरण प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. त्यासाठी कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात आले आहे. ती नोंदणी प्रक्रिया येत्या दोन आवठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.