संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: सहा वर्षांत पाच प्रस्ताव पाठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी अखेर जागा देण्याबाबत राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी निर्णय घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताथवडे येथील वळूमाता केंद्र प्रक्षेत्र येथील ५० एकर जागा उपलब्ध होणार आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (CP Vinay Kumar Choube) यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर गुरुवारी जागा देण्याचा शासनाने निर्णय घेतला. (Pimpri-Chinchwad Police Headquarters)
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड व मीरा भाईंदर पोलीसआयुक्तालयाला मंजुरी दिली. त्यावेळी चिंचवड येथे महापालिका शाळेच्या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. निगडी येथील शाळेत मुख्यालय थाटण्यात आले. दरम्यान, मोशी येथील नऊ एकर जागा आयुक्तालयासाठी मिळाली. मात्र, मुख्यालयासाठी जागेची मागणी कायम होती. राज्याच्या पशुसंवर्धन व विकास विभागाचे ताथवडे येथे वळूमाता केंद्र प्रक्षेत्र आहे. या केंद्रातील ५० एकर जागा शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पोलीसआयुक्तालयाने प्रस्तावित केली. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड पोलीसमुख्यालयाच्या जागेसाठी आयुक्तालय प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आयुक्त विनय कुमार चौबे तसेच तत्कालीन पोलीसआयुक्तांनीही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले.
विनय कुमार चौबे यांचे अथक प्रयत्न
पोलीसआयुक्त चौबे यांनी प्रस्ताव सादर करत मागणी लावून धरली. त्यामुळे श्वान पथक, देहू येथे पोलिसांचे विश्रामगृह, आयुक्तालय प्रशासकीय इमारतीसाठी मोशी येथे नऊ एकर जागा, पोलीसअधिकारी निवासस्थानासाठी कस्पटेवस्ती येथे १५ एकर जागा, तसेच पोलीसमुख्यालयासाठीही ५० एकर जागा मिळाली. पोलीसआयुक्त चौबे यांच्या विशेष प्रयत्नांना यश आल्याचे यावरून दिसून येते.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी आवश्यक बाबींचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात आयुक्तालया व मुख्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या विविध विभागांना हक्काची जागा मिळणार आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
मुख्यालयाच्या जागेत हे साकारणार
- पोलीस भरती, परेड मैदान
- मुख्यालय इमारत
- पोलीस रुग्णालय
- पोलीस पाल्यांसह इतरांसाठी शाळा
- पाेलिस शस्त्रागार
- श्वान पथक
- बाॅम्ब शोधक नाशक पथक
- जलद प्रतिसाद पथक
- मोटार परिवहन विभाग
- अंतर्गत ‘फायर रेंज’
- पोलीस उपायुक्त मुख्यालय
- बहुउद्देशीय सभागृह
- बंदोबस्तावरील पोलिसांचे विश्रामस्थान
- इतर अनुषंगिक कार्यालये
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.