पिंपरी-चिंचवड: महापालिका थकीत कर न भरणाऱ्यांना तंबी, दहा दिवसांत थकीत कर न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळी जमीन अशा ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. थकीत कर न भरणाऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर आता बोजा चढवण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 9 Oct 2024
  • 03:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळी जमीन अशा ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. थकीत कर न भरणाऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर आता बोजा चढवण्यात येणार आहे. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत ही कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येत आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने सर्व मालमत्ताधारकांमधील थकबाकीदारांबाबत सविस्तर माहिती जमा केली असून सर्व प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रथम थकबाकीदारांबाबत कारवाईच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीमध्ये, पाच लाखांहून अधिक थकबाकीदारांच्या यादीचे वाटप संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आले. थकबाकीदारांवर तीन टप्प्यामध्ये कारवाई करण्यात येणार असून त्याबाबतसुध्दा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच, पहिल्या टप्प्यात प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना येत्या दहा दिवसांमध्ये पाच लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांचा सातबारा, प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबरोबर, अधिकाऱ्यांनी संबंधित तलाठ्यांना पत्रव्यवहार करून येत्या दहा दिवसात थकबाकीदारांच्या थकीत रकमेचा बोजा संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावर चढविण्यात यावा. असे निर्देश कर आकारणी व कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिले आहेत. आतापर्यंत चालू वर्षी ३ लाख ७२ हजार ६६७ मालमत्ताधारकांनी ५०७ कोटींच्या कराचा भरणा केला आहे. एकूण मालमत्ताधारकांकडून मागील वर्षीपर्यंतचा ७२५ कोटींचा थकीत कर बाकी असून आंशिक कर भरलेल्यांकडून ४५.७८ कोटींचा थकीत कर येणे बाकी आहे. त्याचबरोबर, चालू वर्षीच्या मागणीपैकी २३३ कोटींचा कर थकीत असून ८४.८ कोटींचा कर आंशिक कर भरलेल्यांकडून येणे बाकी आहे. यामध्ये शहरातील मालमत्ताधारकांमध्ये पाच लाखाहून अधिक रक्कम असलेल्या २,०२२ थकबाकीदारांकडे तब्बल २८०.६८ कोटींचा कर थकीत आहे. या थकीत मालमत्ताधारकांनी येत्या दहा दिवसांमध्ये आपल्या थकीत रकमेचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू करण्याच्या अशा सूचना प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आल्या आहेत. येत्या काळामध्ये जे थकबाकीदार आपल्या थकीत कराचा भरणा करणार नाहीत. अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेकडून जप्त केल्या जाणार आहेत. मालमत्ता जप्तीच्या मोहिमेत जप्त केलेल्या मालमत्तांचा महापालिका लिलाव करणार आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर सदर मालमत्तांचा लिलाव करावा, अशा सक्त सूचना बैठकीमध्ये संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

थकबाकीदारांचा ‘असा’ होणार ‘बोभाटा’

- थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी सर्जनशील अभियानांच्या माध्यमांतून विभाग करणार जनजागृती

- पाच लाखांहून अधिक थकबाकीदारांची यादी असणाऱ्यांची नावे वर्तमानपत्र, सोशल मीडियातून होणार प्रसिध्द

- मालमत्तेसमोर स्पीकरद्वारे थकबाकीदारांची नावे पुकाण्यात येऊन होणार मालमत्ता जप्तीची कारवाई

महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ताधारकांनी सदैव जागरूकपणे कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावला आहे. अद्यापि काही थकबाकीदारांनी आपल्या थकीत कराचा भरणा केला नसून त्यावर आता विलंब शुल्कही लागू झाले आहे. अद्याप कर भरणाऱ्या थकबाकीदारांची संख्या मोठी असून त्यामधील पाच लाखाहून अधिक थकीत रक्कम असणाऱ्या थकबाकीदारांच्या सातबारा उताऱ्यावर येत्या दहा दिवसांमध्ये थकीत रकमेचा बोजा चढवला जाणार आहे. तरी, येत्या दहा दिवसांत आपल्या कराचा भरणा करून दुसऱ्या टप्पात होणारी मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक,  महानगरपालिका

 महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ताकर न भरणाऱ्या थकबाकीदारांमध्ये पाच लाखांहून अधिक मालमत्ताकर असणाऱ्या २०२२ मालमत्ताधारकांकडे तब्बल २८० कोटींचा कर थकीत आहे. मालमत्ताजप्ती मोहिमेच्या सुरुवातीला सदर मालमत्ता महापालिका प्राधान्याने जप्ती करणार असून मालमत्ताधारकांनी त्वरित आपल्या थकीत कराचा भरणा करावा. महापालिकेच्या माध्यमातून विविध माध्यमातून करण्यात येणाऱ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मालमत्तेची कारवाई टाळावी.
-प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), महानगरपालिका

पाच लाखाहून अधिक थकीत रक्कम असणाऱ्या थकबाकीदारांनी येत्या दहा दिवसांमध्ये आपला थकीत कर भरावा. अन्यथा आपल्या सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा चढवला जाणार आहे. थकबाकीदारांनी आपल्या कराचा त्वरीत भरणा करून सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्याची कारवाई, मालमत्ता जप्तीची व मालमत्ता लिलावाची कारवाई टाळावी. कर जमा न करणाऱ्या थकबाकीदारांवर यापुढे महानगरपालिका धडक मोहीम राबवून कर वसुली करणार आहे.
-अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, महानगरपालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest