पिंपरी-चिंचवड: भटक्या श्वानांचा मुद्दा ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे पाळीव श्वानांसाठी डॉग स्पॉट निर्माण करण्यात आला असतानाच दुसरीकडे नागरिकांना भटक्या श्वानांचा त्रास वाढला आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 07:25 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बंदोबस्तासाठी नागरिकांच्या सारथीवर तब्बल सहाशे तक्रारी, पालिकेची निर्बिजीकरणाची प्रक्रिया संथ गतीने

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात एकीकडे पाळीव श्वानांसाठी डॉग स्पॉट निर्माण करण्यात आला असतानाच दुसरीकडे नागरिकांना भटक्या श्वानांचा (Stray Dogs) त्रास वाढला आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांवर हल्ला करणे, चावा घेणे, रस्त्यांवर टोळक्याने फिरणे, घरांसमोर विष्ठा टाकणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या प्रकाराला कंटाळून शहरातील नागरिकांनी भटक्या श्वानांविरोधात सारथी हेल्पलाईनवर तब्बल ६०० तक्रारी केल्या आहेत.

शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत भटक्या श्वानांचे कोणतेही सर्वेक्षण झाले नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नाही. मात्र, शहरातील लोकसंख्येच्या एक टक्के एवढी भटक्या श्वानांची संख्या असते, असे प्रमाण मानले जाते. त्या नुसार शहरात तब्बल ३० हजारांच्या वर भटक्या श्वानांची संख्या आहे. यातील बहुतांश श्वानांचे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून निर्बिजीकरण करण्यात आले आहे.

मात्र, गेल्या काही काळात हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही काळात भटक्या श्वानांची संख्या वाढत चालली आहे. सध्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात मोठ्या संख्येने भटके श्वान दिसतात. खाऊ गल्ली, हॉटेल्स, चिकन-मटणची दुकाने, कचराकुंडी या ठिकाणी भटक्या श्वानांचा वावर जास्त असतो. तसेच छोट्या मोठ्या सोसायट्यांचा पार्किंगमध्येही हे श्वान दिसून येतात. कचऱ्याच्या  पिशव्या कचराकुंडीतून काढून फोडणे, रस्त्यावर, पदपथांवर  विष्ठा टाकणे असे प्रकार या श्वानांकडून होतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण होते. तसेच या श्वानांकडून नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रारी नोंदवल्या आहेत. गेल्या काही दिवसांत भटक्या श्वानांविषयी तब्बल सहाशे तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

एका वर्षात १२ हजार नागरिकांना चावा
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या एक वर्षात १२ हजार नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतला आहे. या सर्व नागरिकांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात आला आहे. यातील काही नागरिक श्वानाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.

काय आहेत तक्रारी?
- भटके श्वान घरासमोर बसून राहतात
- रस्त्यावर, पदपथांवर दररोज घाण करतात
- जाता-येताना श्वान अंगावर धावतात
- दुचाकीच्या मागे धावतात
- कचराकुंडीतील कचरा रस्त्यावर आणतात

पश वैद्यकीय विभाग एका खासगी संस्थेच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करते. शहरात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाचे मोठे काम झाले आहे. मात्र, नागरिकांनी सारथी हेल्पलाईनवर भटक्या श्वानांविषयी तब्बल सहाशे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरू आहे.
- संदीप खोत, उपायुक्त

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest