संग्रहित छायाचित्र
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडवासियांनी गणेशोत्सवात पीएमपीच्या प्रवासाला पसंती दिली. मेट्रो मर्यादित धावत असल्याने, अंतर्गत भागात प्रवास करण्यासाठी आणि खर्चाचा हिशोब केल्यामुळे नागरिकांनी पीएमपी प्रवासाला प्राधान्य दिले. गणेशभक्तांना सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस सेवा सुरू केली होती. त्यामुळे यंदाच्या उत्सवात नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्याकडे जाण्यासाठी या ज्यादा ८०० फेऱ्यांचा वापर केला. दरम्यान, यांच्या काळामध्ये मेट्रो प्रमाणेच पीएमपीलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच, प्रवासी संख्या सव्वा कोटीपर्यंत पोहोचली होती.
गणेशोत्सव काळात पीएमपीकडून ८०० जादा बस सोडल्या होत्या. प्रशासनाने यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवासाठी विशेष नियोजन केले. पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतूक बंद झाल्यावर पर्यायी रस्त्याने वाहतूक केली. पहिल्या टप्प्यात ९, १० आणि १६ सप्टेंबर रोजी १६८ जादा बस तसेच ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान ६२० जादा बस धावल्या. रात्री १२ नंतरही अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पुणे व पिंपरी- चिंचवडमधील विविध स्थानकांतून बसचे नियोजन करण्यात आले होते. मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता यंदा पीएमपी प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली. गणेशोत्सवात देखावे पाहण्याबरोबरच खरेदीसाठीही प्रवाशांनी पीएमपीचा वापर केला. यामुळे अवघ्या ११ दिवसांत प्रवासी संख्या १ कोटी २८ लाखांपर्यंत पोहोचली. तर, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या काळामध्ये १७ हजार ९३ बस धावल्या.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला आठ लाख प्रवाशांनी प्रवास केला. या काळामध्ये एक कोटीचा महसूल प्राप्त झाला. दरम्यान, सहाव्या दिवसानंतर पुण्यातील मंडळांची देखावे, त्याचप्रमाणे मानाच्या गणपतीचे दर्शनासाठी जिल्ह्यातील विविध भागातून भाविक पुण्यात दाखल झाले होते. त्यासाठी त्यांनी प्राधान्याने पीएमपी बसचा प्रवास केला. दरम्यान, सहाव्या दिवशी तब्बल १ कोटी ७८ लाख महसूल मिळाला. तर, या दिवशी प्रवासी संख्या १२ लाखांपर्यंत पोहोचली होती.
अखेरचे तीन दिवस प्रवाशांमध्ये वाढ झाली. तत्पूर्वी १३ आणि १४ सप्टेंबर या दोन दिवशी सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले. अनुक्रमे १ कोटी ८१ लाख तर, १ कोटी ८९ लाख महसूल मिळाला. या दोन दिवशी प्रवासी संख्या साडेतेरा लाखांपर्यंत पोहोचली होती. यानंतर शेवटच्या दोन दिवशी प्रवासी संख्या पुन्हा घटली होती. १६ सप्टेंबर या दिवशी अकरा लाख प्रवाशांनी प्रवास केला. यावेळी एक लाख ५७ हजार उत्पन्न प्राप्त झाले. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदा उत्पन्नात जवळपास एक कोटीची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव पीएमपीला अधिक उत्पन्न मिळून देणारा ठरला. शहराच्या मध्य भागातील रस्ते या काळात सायंकाळनंतर बंद करण्यात येत होते. मात्र पर्याय मार्गाचा वापर करत प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले.
मेट्रो असूनही ७ लाखांनी प्रवासी वाढले
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारा तसेच, अंतर्गत भागातही काही ठिकाणी मेट्रो पोहोचली आहे. यंदा गणेशोत्सव काळामध्ये मेट्रो प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुसरीकडे गेल्या वर्षीपेक्षा यंदा पीएमपीच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये गणेशोत्सव काळात प्रवासी संख्या १ कोटी २१ लाख ६२ हजार होती. ती यंदा १ कोटी २८ लाख ५६ हजारापर्यंत पोहोचली. त्यामुळे जवळपास ६ लाख ९३ हजार प्रवासी वाढले होते.