ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत असल्याची तक्रार; घोटावडे ग्रामस्थांनी घेतली स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची भेट

पुणे: गेल्या चार महिन्यांपासून मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरात ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जात आहे. बारा वाड्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, यामुळे स्थानिक ग्रामस्थांना, गावकऱ्यांना परिसरामध्ये गस्त घालावी लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 05:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत असल्याची तक्रार

स्थानिक गावकऱ्यांवर आली गस्त घालण्याची वेळ

पुणे: गेल्या चार महिन्यांपासून मुळशी तालुक्यातील घोटावडे परिसरात ड्रोनच्या माध्यमातून रेकी केली जात आहे. बारा वाड्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.  यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, यामुळे स्थानिक ग्रामस्थांना, गावकऱ्यांना परिसरामध्ये गस्त घालावी लागत आहे. यामुळे जिल्हा ग्रामीण अधीक्षक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या पौड पोलिसांनी याबाबत खबरदारी घ्यावी, या विरोधात तत्काळ तक्रार दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत नुकतीच पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची भेट घेतली. आयटीनगरी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घोटावडे परिसरात चोरांची दहशत आहे. घातक शस्त्र घेऊन चोरांची टोळी मध्यरात्री नंतर फिरत असल्याने ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले आहेत.  दररोज कुठे ना कुठे चोर आल्याच्या घटना घडत असल्याने घोटावडे ग्रामस्थ संपूर्ण रात्र जागून काढत आहेत. चोरांच्या वाढत्या दहशतीमुळे स्थानिक ग्रामस्थांनी नुकतीच पौड पोलीस ठाण्याचे प्रमुख संतोष गिरीगोसावी यांची भेट घेऊन त्यांना तक्रार अर्ज दिला आहे. मौजे घोटावडे गाव आणि संलग्न बारा वाड्यांमध्ये मागील तीन ते चार महिन्यांत ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून व त्या रेकीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा वापर करून घरफोड्यांचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत बाराहून अधिक ठिकाणी चोरीचा प्रयत्न झालेला आहे. या टोळीमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यांच्याकडे कोयता, कुऱ्हाडी, पहार अशी घातक शस्त्रे असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.

गावातील युवकांचा ग्रुप तयार करून ग्रामस्थ रात्री-अपरात्री गस्त घालत आहेत. अनेकदा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होत आहेत. घातक शस्त्र  घेऊन चोरांची टोळी फिरत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. परिस्थिती गंभीर आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहे. चोरट्यांचा पाठलाग केला असता ड्रोनसुद्धा त्याच दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोऱ्या करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चोरांच्या दहशतीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुळशी तालुक्यातील विविध गावात त्याचे लोन पसरत आहे. गावातील नागरिकांना जागृत केले आहे. ग्रामस्थ संपूर्ण रात्र जागून काढत आहेत. पौड पोलिसांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन, ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. रात्र झाली की ड्रोन फिरतात. अतिशय कमी आवाज असल्याने ते लक्षात येत नाही. नागरिकांनी याची जास्तीत जास्त माहिती पुढे येऊन पोलिसांना देणे आवश्यक आहे.
- शरद गोडांबे, ग्रामस्थ, घोटावडे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest