चिंचवडमध्ये रंगली आठ तास मिरवणूक, ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप
ढोल ताशांचा गजर, फुलांची मुक्त उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया' अशी आरोळी देत चिंचवड येथील विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास रंगली. या वेळेत जवळपास ४० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत गाजत बाप्पांना निरोप दिला. विशेष म्हणजे यंदा मोठ्याने आवाज करणारे डॉल्बी, डीजे याला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले.
चिंचवडमधील मिरवणुकीला चार वाजता सुरुवात झाली. महापालिकेकडून स्वागतासाठी स्वागत स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. मुख्य मंडळे चापेकर चौकात येण्यासाठी रात्रीचे साडे आठ वाजले. दरम्यान प्रथम आनंदनगर चिंचवड येथील गिरीराज मित्र मंडळाची मिरवणूक चार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर हळूहळू सार्वजनिक गणेश मंडळे चापेकर चौकात येऊ लागली. साडेपाच वाजता नव गजानन मित्र मंडळाची मिरवणूक चौकात आली. मात्र त्यानंतर जवळपास दीड तास एकही मिरवणूक आली नव्हती. सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड चौकामध्ये भाविकांची हळूहळू गर्दी जमण्यास सुरुवात झाली. सव्वा सातच्या सुमारास श्रीधरनगर येथील स्वराज्य मित्र मंडळाची मिरवणूक वाजत गाजत आली. यानंतर एकापाठोपाठ एक मंडळाचे मिरवणूक चौकात येऊ लागल्या. आठच्या सुमारास आनंदनगर मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चौकात दाखल झाली. या मंडळाने कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी, संबळवादक सहभागी झाले होते. ढोल ताशाचा निनाद आणि बाप्पांचा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यानंतर पावणे नऊच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आरंभ ढोल ताशा पथक, बालवारकरी सहभागी झाले होते. विठ्ठलाचा रथ साकारला होता. यानंतर खऱ्या अर्थाने मिरवणुकी सुरुवात झाली. तसेच, बघयांची गर्दी देखील वाढत गेली. नऊ वाजेच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील तरुण मित्र मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत पालखीतून मिरवणूक काढली. या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीने सर्वांच्याच नजरा रोखून धरल्या होत्या. यानंतर चिंचवडगावातील प्रसिद्ध असा गांधी पेठ तालीम मित्र मंडळाची मिरवणूक चापेकर चौकामध्ये साडे नऊच्या सुमारास आली. श्रीराम मोरया दरबार देखावाचा चित्ररथ साकारण्यात आला होता. यानंतर पंधरा मिनिटांनी लगेच चिंचवड गावातील सिद्धिविनायक मित्र मंडळाची मिरवणूक दाखल झाली. मुंजोबा मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. काळभैरवनाथ मित्र मंडळाने रामरथ साकारला आहे. ‘पवनामाई आमची माता, आम्हीच तिचे रक्षणकर्ता’ असे मजकूर असलेला फलक लावता नदी संवर्धनाचा संदेश दिला. गजाक्ष ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. ज्ञाप्रबोधिनीच्या १५० विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. रात्री दहा ते अकरा या वेळेत जवळपास १२ हुन अधिक मंडळांची मिरवणूक चापेकर चौकात आली. दरम्यान रात्री बारानंतर मिरवणुका येत होत्या. मोरया मित्र, समता मित्र मंडळ, एम्पायर इस्टेट, साईबाबा तरुण मंडळ ही मंडळी रात्री उशिरा दाखल झाली.
निगडीतील गणेश तलाव परिसरात भाविकांची गर्दी
आकुर्डी, निगडी, रावेत परिसरातील मंडळांनी ’गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. एका पाठोपाठ एक आगमन होणार्या घरगुती आणि मंडळांच्या गणेशभक्तांची गणेश तलाव आणि रावेत घाटावर एकच गर्दी लोटली होती. रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात झाले. गणेश तलावाच्या ठिकाणी पालिकेने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी स्वागत कमान बांधली होती. रस्त्यावर आणि विसर्जनाच्या ठिकाणी भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली होती. निर्माल्य संकलनाची सोय करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत एकूण ४१२४ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये २७ मंडळांच्या मूर्तीचा समावेश होता.
रावेत घाट
रावेत घाटांवर देखील दिवसभरात निगडी, आकुर्डी व रावेत भागातील बारा मोठ्या मंडळांनी गणेश विसर्जन केले. घरगुती गणपती आणि पाच फुटाखालील गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. मूर्ती विसर्जनासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. घाटावर पालिकेने सुरक्षेसाठी बॅरिगेट्स लावले होते. निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंडाची व्यवस्था होती.