पिंपरी-चिंचवड: आमची घरे पाडा, आम्ही तिन्ही आमदार पाडू

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रालगत, पूररेषेच्या जागेतच २५०० बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. ही बांधकामे पाडण्यास स्थानिकांनी विरोध केला असून पूररेषेतील घरे पाडली तर ८ लाख मतदार पिंपरी-चिंचवडच्या तिन्ही आमदारांना पाडतील

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Sep 2024
  • 06:52 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पिंपरी-चिंचवड: आमची घरे पाडा, आम्ही तिन्ही आमदार पाडू

पूररेषा रहिवासी संरक्षण समितीने दिला इशारा, महापालिका प्रशासन सर्वेक्षण आणि कारवाईवर ठाम

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रालगत, पूररेषेच्या जागेतच २५०० बांधकामे असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आहे. ही बांधकामे पाडण्यास स्थानिकांनी विरोध केला असून पूररेषेतील घरे पाडली तर ८ लाख मतदार पिंपरी-चिंचवडच्या तिन्ही आमदारांना पाडतील, असा इशारा पूररेषा रहिवासी संरक्षण समितीने दिला आहे. तर, महापालिका प्रशासन कारवाईवर ठाम आहे.

अतिवृष्टी आणि धरणातील विसर्गामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीला पूर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे महापालिकेने पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण केले. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नद्यांच्या पात्रालगत असलेल्या आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानुसार शहरात नद्याच्या पात्रालगत व पूररेषेत निवासी, व्यावसायिक असे एकूण २५१७ बांधकामे आढळून आली आहेत. यामध्ये निवासी १३०८ आणि व्यावसायिक ११८२, इतर २७ अशी बांधकामे आहेत.  त्या सर्व बांधकामांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान सांगवी भागातील नागरिकांना कारवाईला विरोध केला आहे. सांगवीतील घरे पाडली तर आठ लाख मतदार तिन्ही आमदारांना निवडणुकीत पाडण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. याबाबत फलक लावून सांगवी भागात जनजागृती केली जात आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन कारवाईवर ठाम आहे.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले की,  क्षेत्रीय कार्यालयाकडून नदीपात्रालगत व पूररेषेतील निवासी व व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत २५०० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यानुसार सर्वांना नोटीस देण्यात येत आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. सर्वेक्षण पूर्ण होताच अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest