पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या तक्रारींना आयुक्तांकडून वाटाण्याच्या अक्षता, पालिकेची दक्षता व गुणनियंत्रण समिती नावापुरतीच

पिंपरी-चिंचवड: शहरातील महापालिकेच्या निकृष्ट व दर्जाहीन झालेल्या विविध कामाच्या तक्रारी सुज्ञ नागरिक हे आयुक्तांकडे करतात. मात्र, त्या तक्रारींकडे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे पाहून आयुक्तांकडून कानाडोळा केला जातो. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Sep 2024
  • 03:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News, Pimpri Chinchwad

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: शहरातील महापालिकेच्या निकृष्ट व दर्जाहीन झालेल्या विविध कामाच्या तक्रारी सुज्ञ नागरिक हे आयुक्तांकडे करतात. मात्र, त्या तक्रारींकडे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे पाहून आयुक्तांकडून कानाडोळा केला जातो. त्यामुळे कामाची गुणवत्ता राहात नाही. त्याचाच फायदा घेऊन अधिकारी दर्जाहीन कामे करू लागले आहेत. यामुळे महापालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण समितीला कामच राहिले नसून दोन वर्षांत विविध प्रकरणांच्या फक्त चौकशी होत आहेत. आतापर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजाबाबत दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडे दोन वर्षांत ४४ तक्रारी आलेल्या आहेत. मात्र, त्यातील काही तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तर ज्या तक्रारींमध्ये आयुक्तांच्या मर्जीतले अधिकारी अडकणार आहेत, त्यांच्यावर निर्णय न देता त्या तशाच आयुक्तांच्या केबिनमध्ये पडून आहेत. त्यामुळे गुण नियंत्रण कक्षातही कामांच्या गुणवतेबाबत लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे, तर नागरिकांच्या तक्रारींकडेही  आयुक्त लक्ष देऊन दक्षता व गुण नियंत्रण विभागाकडे पाठवत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या विविध विभागात कामे केल्यानंतर क्वॉलिटी कंट्रोलकडून ठेकेदारांच्या साहित्याचे परीक्षण करण्यात येते. त्यामुळे त्या साहित्याचे ठेकेदार प्रयोगशाळेत दर्जेदार मटेरियलचे नमुने देतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात मात्र, निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरतात. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची थेट तपासणी व सुपरव्हीजन केले जात असले तरी त्यात अधिकारी व ठेकेदारांचे लागेबांधे असल्यामुळे हे काम गुणवत्ता नियंत्रकाच्या प्रयोगशाळेतून निरीक्षण केलेल्या मटेरियलप्रमाणे होत नसल्याचे दिसून येत आहे.

 दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य विभागातील १४ कामांमध्ये अकरा ठेकेदारांनी केलेली कामे निकृष्ट व दर्जाहीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्या कामाची वसुली ठेकेदारांकडून करून एक वर्षासाठी ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांना केवळ नोटीस देऊन दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात येत आहे. यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सौम्य कारवाई करून फौजदारी कारवाईतून वाचवण्यात येऊ लागल्याचे दिसत आहे.

साहित्याची तपासणी न करताच कामे
रस्ते, पूल, इमारत, बंधारे व इतर शासकीय बांधकामात कामाचा दर्जा घसरू नये, म्हणून शासनाने क्वॉलिटी कंट्रोलच्या प्रयोगशाळेतून बांधकाम साहित्याची तपासणी करणे सक्तीचे केले असले, तरी या विभागातून परीक्षण केलेले बांधकाम साहित्य बहुतांश ठेकेदार प्रत्यक्षात वापरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच महापालिकेत विविध कामांमध्ये दर्जाहिन साहित्य वापरणे, त्याच निविदा पुन्हा काढणे असे प्रकार होत असूनही त्यावर दक्षता कमिटीचा होल्डच नसल्याने महापालिका अनागोंदी कारभार सुरू आहे. 

दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडे आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार चौकशी करण्यात येते. काही प्रकरणांमध्ये त्रयस्थ संस्थेकडूनही कामांची चौकशी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल तयार करून आयुक्तांकडे सादर केले आहेत.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका

जानेवारी २०२२ ते  मार्च २०२३ पर्यंत तक्रारी

एकूण तक्रारी..............................४४
निपटारा.....................................२९
प्रक्रियेत......................................१०
निरस्त........................................०५

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest