पिंपरी-चिंचवड: यंदा आवाजाची पातळी घटली; भोसरी परिसरात सर्वात कमी आवाज

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरातही आवाजाच्या पातळीमध्ये यंदा घट झाल्याचे दिसून आले. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे स्पीकर, डॉल्बी, डीजे अशा विविध कारणांनी आवाज वाढतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 20 Sep 2024
  • 07:33 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एमपीसीबीने पुण्यापाठोपाठ शहराची घेतली नोंद

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरातही आवाजाच्या पातळीमध्ये यंदा घट झाल्याचे दिसून आले. गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे स्पीकर, डॉल्बी, डीजे अशा विविध कारणांनी आवाज वाढतो. यामुळे हा आवाज कमी करून पारंपरिक ढोल-ताशांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने  केले होते. दरम्यान, याचे तंतोतंत पालन करण्यात काही मंडळांनी पुढाकार घेतला. त्यामुळे वाकड, थेरगाव, काळेवाडी हा भाग वगळता चिंचवड, पिंपरी या दोन ठिकाणी आवाजाची पातळी घटली होती. सर्वात कमी आवाज भोसरी परिसरात नोंदवला गेला.

पिंपरी-चिंचवड शहरात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. परंपरागत वाद्यांच्या आधारे विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या ठिकाणची आवाजाची पातळी नेहमीच मर्यादित राहते. मात्र यंदा गतवर्षीपेक्षा आवाजामध्ये मोठी घट झाली आहे. अर्थात शहरातील मंडळांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन उपाययोजना केल्याची दिसून येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियंत्रणाखाली घेण्यात आलेल्या नोंदणीनुसार पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या प्रमुख तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आवाजाची पातळी नोंदवण्यात आलेली आहे.

दरम्यान, पिंपरीची गणेशोत्सव मिरवणूक सरासरी नऊ तास चालली तर, चिंचवड येथील मिरवणूक आठ तास होती. पिंपरीच्या मानाने चिंचवड परिसरात पारंपरिक ढोल ताशा, बँड या पथकांचा वापर केला होता. त्यामुळे आवाज मर्यादित राहिला. त्याचप्रमाणे अनेक सार्वजनिक मंडळांनी वेळेपूर्वी आपली मिरवणूक संपवली. त्यामुळे एकाच वेळी होणारा आवाजही घटला. परिणामी, नागरिका विना त्रास मिरवणुकीचा आनंद लुटता आला. चिंचवड आणि पिंपरी वगळता थेरगाव आणि वाकड परिसरामध्ये यंदा डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट याचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे या ठिकाणची मिरवणूक देखील मोठ्या प्रमाणात रेंगाळली होती. गेल्या वर्षी शहरातील पिंपरी या  ठिकाणची शांतीनगर भागात सर्वाधिक आवाजाची गणना झाली होती. मात्र यंदा त्यात घट झाली आहे, तर भोसरीमध्ये आवाजाच्या पातळी वाढ झाली असली तरी केवळ एक ते दीड डेसिबलने वाढली आहे. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवड या मानाने भोसरीमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ७८ डेसिबल आवाजाची पातळी नोंदवली गेलेली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest