पिंपरी-चिंचवड : विविध तलाठी कार्यालयांमध्ये नव्याने १० 'भाऊसाहेबां'ची नेमणूक

पिंपरी-चिंचवड: शहरात असणाऱ्या विविध तलाठी कार्यालयाला अधिकाऱ्यांना प्रतीक्षा होती. त्यातच काही नव्याने झालेल्या तलाठी कार्यालयात कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड होती. अखेर नव्याने दहा अधिकारी रुजू झाले असून, विविध उपनगरातील कार्यालयांत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 08:05 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आठ तलाठ्यांवर चालत होता ३१ कार्यालयांचा अतिरिक्त भार, नव्याने झालेल्या कार्यालयासही मिळाले कारभारी

पिंपरी-चिंचवड: शहरात असणाऱ्या विविध तलाठी कार्यालयाला अधिकाऱ्यांना प्रतीक्षा होती. त्यातच काही नव्याने झालेल्या तलाठी कार्यालयात कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड होती. अखेर नव्याने दहा अधिकारी रुजू झाले असून, विविध उपनगरातील कार्यालयांत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

यापूर्वी केवळ आठ तलाठ्यांवर ३१ कार्यालयांच्या कामकाजाचा अतिरिक्त भार पडला आहे. परिणामी नागरिकांची कामे रखडत आहेत.  

उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यासह अनेक दाखले काढण्यासाठी तलाठी कार्यालयात नागरिक हेलपाटे मारतात. आपली कामे जलद गतीने व्‍हावीत अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील अपुऱ्या तलाठी अभावी कामे होत नव्हती. त्यामुळे एका तलाठ्यावर त्याच मंडलतील इतर तलाठी कार्यालयाचा पदभार देण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या काही तासच तलाठी उपलब्ध होत होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयांतर्गत तलाठ्यांची संख्या अपुरी असल्याची नेहमीच ओरड होत होती. तलाठ्यांची रिक्‍त असलेल्‍या पदांबाबतचा अहवाल पिंपरी-चिंचवड अप्‍पर तहसिल कार्यालयातून दर महिन्‍याला पाठवला जात होता. मात्र विविध कारण देऊन अधिकारी मिळण्यास अडचणी येत होत्या. निवडणुका, आचारसंहिता, बदल्या त्याचप्रमाणे नव्याने झालेली भरती या पेचात तलाठी देण्याची काम रखडले होते. शासनस्‍तरावर त्‍याबाबत सकारात्‍मक निर्णय होत नव्‍हता. नुकतीच राज्‍य शासनाने तलाठ्यांच्‍या आठ हजार पदांची भरती जाहिर करून त्‍याची परिक्षा घेतली होती. परिणामी तलाठी नियुक्‍ती होऊन नागरिकांची कामे वेगाने कधी होणार, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता.

दरम्यान, चिंचवड, निगडी, देहू, भोसरी आणि मोशी या चार मण्डल कार्यालय अंतर्गत तलाठी भाऊ साहेबांची संख्या अगदी मोजकी होती. त्यातच चिंचवड, भोसरी  या ठिकाणी लोकसंख्या मोठी असल्याने नागरिकांची कामे होत नव्हती. त्यामुळे तहसील कार्यालयात त्याबाबत अनेक तक्रारी देखील केल्या होत्या. देहू येथील तलाठी कार्यालय केवळ अधिकारी नसल्याने अनेक दिवस बंद होते. तर, चिंचवड, आकुर्डी, रहाटणी, चिखली यांसारखे काही कार्यालय दुपार नंतर बंद ठेवण्यात लागत होते. मात्र आता नव्याने रजू झालेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेमणूक केली आहे.

येथे झाली नवीन तलाठ्यांची नेमणूक
पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयांतर्गत एकूण ३१ तलाठी कार्यालयाचा समावेश होतो. केवळ आठ तलाठी कार्यरत आहेत. आता त्यात वाढ होवून नव्याने अधिकारी रजू झाले आहेत. त्यात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, कीन्हई, चिंचोली, बोराडेवाडी, तळवडे, भोसरी 2, निरगुडी, चोविसावाडी, वडमुख वाडी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.  

नवीन तलाठ्यांना नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील. याबाबत ताण असलेल्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली आहे. मंडळ अधिकारी हे त्यावर देखरेख ठवेत आहेत
- जयराज देशमुख,  तहसीलदार, पिंपरी-चिंचवड, अप्पर तहसील कार्यालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest