Pimpri Chinchwad: महाविद्यालय परिसरात युवकांच्या 'टवाळकीला ऊत'

पिंपरी-चिंचवड शहरातील शांत आणि शिस्तप्रिय असलेल्या निगडी प्राधिकरण परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून त्रासले आहेत. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी महाविद्यालय युवकांचा होणारा गोंगाट आणि गोंधळ.

Pimpri Chinchwad College Students

महाविद्यालय परिसरात युवकांच्या 'टवाळकीला ऊत'

महाविद्यालय परिसरात युवकांचा प्रचंड गोंगाट, शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निगडीतील नागरिकांचे जगणे झालेय अवघड, थेट पोलीस आयुक्तांकडे करणार तक्रार

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड शहरातील शांत आणि शिस्तप्रिय असलेल्या निगडी प्राधिकरण (Nigdi Pradhikaran) परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून त्रासले आहेत. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी महाविद्यालय युवकांचा होणारा गोंगाट आणि गोंधळ. विशेषतः प्राधिकरणातील सेक्टर २७, २८ आणि रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात हा प्रकार नित्याचाच ठरला आहे. या महाविद्यालयीन युवकांना नागरिक इतके त्रासले आहेत की, त्यांनी या प्रकरणाची थेट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. (Pimpri Chinchwad News)

निगडी परिसरात सुमारे ८ ते १० महाविद्यालये आहेत. तसेच, काही खासगी क्लासेस आहेत. यातील काही महाविद्यालयांच्या परिसरात 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, हा प्रकार दिसून आला. विद्यार्थ्यांची सकाळच्या वेळी मोठी ये-जा सुरू असते. त्यातच यापैकी काही विद्यार्थी कर्णकर्कश हॉर्न वाजवत वेगात दुचाकी दामटतात. तर कधी बुलेटच्या फटाक्यांचा आवाज करतात. रहिवाशांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या विद्यार्थ्यांना काही नागरिकांनी हटकले होते. मात्र विद्यार्थ्यांनी नागरिकांना उर्मट भाषेत प्रत्युत्तर दिले. त्याचे पर्यावसन  शाब्दिक वादावादीत झाले. त्यानंतर हे टवाळखोर महाविद्यालयीन युवक सातत्याने जोरजोरात हॉर्न वाजवून परिसरात घिरट्या घालू लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

निगडी परिसर अत्यंत शांत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मुख्य व सेवा रस्ते दोन्ही प्रशस्त आहेत. परिणामी, महाविद्यालयीन तरुणांकडून वाहने दामटली जातात. अनेक विद्यार्थ्यांकडे वाहन परवाना नसूनही, एका वाहनावर ट्रिपल सीट बसून वाहने फिरवली जातात. एकाच वेळी दहा ते बारा दुचाकी फिरवल्या गेल्याने जास्त प्रमाणात आवाज होतो. याबाबत आकुर्डी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मकसुद मणेर यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, या परिसरात गस्त सुरू असून, अद्याप कोणा नागरिकाने याबाबत तक्रार केलेली नाही.

स्थानिकांच्या घरासमोर पार्किंग

महाविद्यालय, शाळा या ठिकाणी येणारे पालक, विद्यार्थी आपली वाहने बेशिस्तपणे पार्क करतात. अनेकदा ती वाहने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोसायटी, बंगल्यांसमोर पार्क केली जातात. यातून वाद होत असून, नागरिक थेट पोलिसांकडे याची तक्रार करत आहेत.

दामिनी पथक ॲक्टिव्ह

या प्रकारानंतर तेथील काही पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर या ठिकाणी दामिनी पथक ॲक्टिव्ह केले आहे. मुलींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे, त्यांना टॉन्ट मारणे असे प्रकार घडतात. त्यासाठी काही अल्पवयीन मुलांना ताब्यातही घेतले होते. पालकांनाही त्याबाबत कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळी आतषबाजी निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २७ परिसरात रात्री साडेबारानंतर मोठ्या प्रमाणात आतषबाजी होत असल्याचे सांगत प्राधिकरणातील नागरिक सुधीर महाजन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, इस्कॉन टेम्पल परिसरातही रात्रीच्या वेळी फटाके वाजवण्यात येतात, असेही एकाने सांगितले.

सोशल मीडियावर तक्रारींचा ओघ

निगडी परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर या समस्येला वाचा फोडली. त्यावेळी अनेकांनी असा प्रकार आमच्या भागातसुद्धा होत असल्याचे सांगितले. तसेच, हा प्रकार अलीकडच्या काळात आणखी फोफावत आहे. या समस्यांच्या पोस्टवर काहींनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार, तर काहींनी राजकीय व्यक्तीची मदत घेण्याचा सल्ला दिला. काही ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा आणि रस्त्यावर  उतरून विद्यार्थ्यांना ठणकावून सांगावे, असे सांगितले.

विद्यार्थी रिल्स, व्हीडीओ बनवण्यात व्यस्त

निगडीतील काही प्रमुख महाविद्यालय परिसराची पाहणी केली असता, रस्त्यावरच अनेक विद्यार्थी घोळका करून थांबले होते. काही विद्यार्थी व्हीडीओ, इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यामध्ये व्यस्त होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest