Pimpri Chinchwad: जलतरण तलाव उन्हाळ्यात बंद, पावसाळ्यात सुरू!

ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरुस्तीची कामे काढून अनेक जलतरण तलाव बंद ठेवल्याने नागरिकांतून क्रीडा विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच वार्षिक शुल्कदेखील ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिकांना परवडेना झाले आहेत.

Pimpri Chinchwad Swimming Pool

जलतरण तलाव उन्हाळ्यात बंद, पावसाळ्यात सुरू!

देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील अनेक तलाव बंद, वाढीव शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेर!

विकास शिंदे
ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरुस्तीची कामे काढून अनेक जलतरण तलाव बंद ठेवल्याने नागरिकांतून क्रीडा विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच वार्षिक शुल्कदेखील ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिकांना परवडेना झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वार्षिक शुल्क ५०० रुपये असणारा पास आता त्यात वाढ करून २ हजार ८३२ रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे नोकरदार सेवानिवृत्त नागरिक, सर्वसामान्य नागरिक हे पैसे कसे भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शहरातील पाच जलतरण तलाव अद्यापही बंद ठेवल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.  

महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. वर्षभर चालणारी देखभाल-दुरुस्तीची कामे, प्रचंड वाढलेले शुल्क, ऐन उन्हाळ्यात देखभाल-दुरुस्तीची कामे काढून बंद ठेवलेले जलतरण तलाव यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी कशी, असा प्रश्न  पडला आहे.  

शहरातील जलतरणप्रेमी नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात तेरा जलतरण तलाव बांधले आहेत. या सर्व तलावांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे मुख्यत्वे स्थापत्य आणि विद्युत विभागांकडून केली जातात. मात्र, योग्य नियोजन न केल्याने आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी निश्चित मुदत नसल्याने अनेकदा ही कामे सलग अनेक वर्षे चालत असल्याचे दिसून येते. या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे जलतरणप्रेमींच्या हौसेवर पाणी पडत आहे.

अलीकडेच काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने अनेक वर्षे शुल्क वाढ केली नसल्याचे कारण, देत प्रचंड शुल्कवाढ लागू केली. मात्र, दुसरीकडे तेवढ्याच तत्परतेने आणि कार्यक्षमतेने नागरिकांना सेवा देण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याच्या हंगामात तापमान ४० अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे. तापमान झपाट्याने वाढत असताना पाच जलतरण तलावांची स्थापत्य, विद्युत आणि देखभाल विषयक कामे सुरू असून त्यासाठी हे तलाव सुमारे दोन वर्षांपासून बंद ठेवले आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या क्रीडा विभागाने सन २०१७ मध्ये जलतरण तलावासाठी जे शुल्क होते, त्यात वाढ करून २०२४ मध्ये वार्षिक शुल्क पाचपटीपेक्षा अधिक वाढवले आहे. पूर्वी  ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त नागरिकांना ५०० रुपये शुल्क हे वर्षभर पास मिळत होता. आता तो २ हजार ८३२ रुपये झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होऊ लागला आहे.

त्याचप्रमाणे लहान मुले, महिला, पुरुष यांचे देखील काही वर्षांपूर्वीचे वार्षिक शुल्क पाहिले तर ते खूपच कमी होते. ते देखील प्रचंड वाढले आहे. हे शुल्क वाढवून जलतरणप्रेमी नागरिकांवर अन्याय केला आहे. नागरिक आपले आरोग्य सुदृढ राहावे म्हणून पोहोण्यास येतात. मात्र, वार्षिक शुल्कवाढ करून एक प्रकारे प्रशासनाने नागरिकांवर अन्यायच केला आहे.

देखभालीची वर्षभर बोंब

काही जलतरण तलाव चालविण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नसल्याने त्याची निविदा काढून ते खासगी संस्थेला देखभाल दुरुस्तीसाठी दिले जातात. पण, या जलतरण तलावातील फरशा तुटणे, गळती होणे, जलशुद्धीकरण यंत्रणा खराब होणे आदी कारणांमुळे जलतरण तलाव बंद पडतात. काही जलतरण तलावात पिंपळ, वड, बाभूळ अशी झाडे उगवली आहेत. ते काढण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने नळ, दिवे, पत्र्याचे शेड, लोखंडी बार यासह इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत. तळीरामांना दारू पिण्यासाठी हक्काची जागा मिळत आहे.

सुरू जलतरण तलाव

नेहरुनगरमधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरी वाघेरे, कासारवाडीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे , सांगवीतील कै. बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई ॲक्वामरिन हे आठ तलाव सुरू आहेत.

बंद जलतरण तलाव

थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, आकुर्डी-प्राधिकरणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत. त्यांची अवस्था सुधारण्यासाठी आणखी काही कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. याची तरतूद अर्थसंकल्पात झाली; तर जलतरण तलावांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

जे जलतरण तलाव बंद अवस्थेत आहेत, त्या तलावाचे स्थापत्य, विद्युत विषयक कामकाज सुरू आहे. स्थापत्यविषयक कामामुळे पाच जलतरण तलाव बंद आहेत. जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीवर खूप खर्च येत आहे. त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे.

- अनिता केदारी, क्रीडा अधिकारी, महापालिका पिंपरी-चिंचवड

शहरातील जलतरण तलावावर पोहण्यास येणा-या नागरिकांच्या वार्षिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त नागरिकांचे वार्षिक पास हे पावणे तीन हजार रुपये झाले आहे. एवढी रक्कम त्यांनी आणायची कोठून, त्यात लहान मुले, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनादेखील आताचे वाढीव शुल्क परवडेना झाले आहे. त्यामुळे वाढील शुल्क त्वरित कमी करावेत.

-  राजू सावळे, शहर उपाध्यक्ष, मनसे, सांगवी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest