संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये ८,५५,१०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग) देण्यात आले असून ५,३२,३०७ मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप करण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या मोजमाप प्रक्रियेमध्ये नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांपैकी ५२,७८७ मालमत्तांपर्यंत विशेष नोटीस १ चे वाटप करण्यात आले असून यामधील २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्यापैकी १६,९५३ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून त्यांना अंतिम बिल मिळाले आहे. यामधील ४,२६१ मालमत्ताधारकांनी ८,९९५४,२८९ रुपये कराचा भरणा केला असून ४,१३४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून त्यावरील सवलतींचा लाभ घेतला आहे.
आत्तापर्यंत विशेष नोटीस १ मिळालेल्या मालमत्ताधारकांपैकी २२,५८२ मालमत्ताधारकांनी हरकती दाखल केल्या असून यापैकी २०,४७५ मालमत्ताधारकांनी ऑफलाइन पद्धतीने, तर २,१०६ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात हरकती दाखल केल्या आहेत. नागरिकांनी मिळालेल्या नोटीसवरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीनेच नोटीस मान्य करून आपले बिलसुद्धा प्राप्त करावे. तसेच त्यानंतर मालमत्ताकराचा भरणाही ऑनलाइन स्वरूपात करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच ज्या नागरिकांना मालमत्तेबाबत हरकत दाखल करावयाची असेल त्यांनी ऑनलाइन हरकत दाखल केल्यानंतर त्यावर तत्काळ निपटारा आणि हरकतींवर सुनावणीसुद्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांनी हरकत दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाकडून देण्यात आली आहे.
ज्या मालमत्ताधारकांना विशेष नोटीस १ प्राप्त झाल्यानंतर नोटीस अमान्य असल्यास हरकत दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेबाबत, करयोग्य मूल्य मान्य नाही, आकारणी दिनांक मान्य नाही, करपात्र क्षेत्रफळ मान्य नाही, मालमत्तेवरील नावामध्ये चूक, मालमत्तेवरील पत्ता चुकीचा, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचा इत्यादीबाबत हरकती दाखल करता येतात. नागरिकांनी अशा हरकतींबाबत आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने पूर्तता केल्यावर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष नोटीस प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत वरील हरकती असतील तर त्या दाखल करणे आवश्यक आहे. ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरल्यास ५ टक्के तर ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरात सर्वच मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणांतर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांना विशेष नोटीस १ वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांना आपल्या नोटीसवर हरकती नोंदवायच्या असतील, अशा मालमत्ताधारकांनी नोटीसवर दिलेल्या 'क्यूआर कोड'द्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने जलद गतीने निपटारा करण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक