Pimpri Chinchwad: हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये टाकला स्क्रॅप

चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मालकी हक्काचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्ट आहे. त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये कुदळवाडी, चिखली भागातील स्क्रॅपचा कचरा आणि राडारोडा टाकून बुजवला जात आहे.

हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये टाकला स्क्रॅप

रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या 'सारथी'वर १५ तक्रारी, राजकीय दबावामुळे कारवाईस टाळाटाळ, कारवाई टाळण्यामुळे रहिवासी संतप्त

विकास शिंदे

चिखली (Chikhali) येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मालकी हक्काचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्ट आहे. त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये कुदळवाडी, चिखली भागातील स्क्रॅपचा कचरा आणि राडारोडा टाकून बुजवला जात आहे. या संदर्भात महापालिकेच्या सारथीवर सोसायटीकडून तब्बल १५ तक्रारी करण्यात आल्या. तर आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली. परंतू, राजकीय दबावापोटी संबंधित कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सोसायटीतील राहणारे रहिवासी नागरिक हतबल झाले असून आयुक्त हे जनतेचे की राजकीय पुढाऱ्यांचे असा संतप्त सवाल रहिवासी उपस्थित करू लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात चिखली येथील गट नंबर ९० मध्ये रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी असून साधारणपणे दीड हजार फ्लॅट या सोसायटीत आहेत. सदरील फेज १ आणि २ सोसायटीच्या मालकी हक्काच्या जागेत एक दगडाची खाण आहे. त्या खाणांची तेथील रहिवाशांनी मिळून मालकी हक्कांच्या जागेत जलसंधारण विभागाकडील रितसर परवानगी घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्ट तयार केला आहे. खाणीत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी सोडण्यात आलेले आहे. त्याशिवाय त्या दगडाच्या खाणीत देखील नैसर्गिकरित्या मुबलक पाणी उपलब्ध आहे.

सदरील दगडाची खाण ही सोसायटीच्या मालकीची असताना देखील कुदळवाडी, चिखली भागातील भंगार दुकानातील स्क्रॅप, केमियुक्त साहित्य, राडारोडा हा त्रयस्त व्यक्तींकडून टाकला जात आहे.  स्क्रॅपचा कचरा, राडारोडा टाकल्याने त्या खाणीतील पाणी देखील प्रदूषित होऊन जलपर्णी तयार झाली आहे.

या दगडाच्या खाणीत दररोज वेगवेगळ्या भागातील लोक येऊन कचरा टाकल्याने सोसायटीच्या मालकीची खाण ही राडारोड्याने बुजवली जाईल. यामुळे सोसायटीचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प देखील बंद होईल. त्याच बरोबर खाणीतील नैसर्गिक पाण्याचा स्रोतदेखील बंद होण्याची शक्यता आहे.

रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीच्या मालकी हक्काच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्टमध्ये काही समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, मेटल, स्क्रॅप टाकण्यात आले. हा कचरा काढण्याकरिता संबंधित व्यक्तीला सोसायटीकडून पुरेपूर वेळ देण्यात आला. तरीही खाणीत टाकलेला घातक कचरा उचललेला नाही.

याबाबत महापालिकेच्या सारथी विभागाकडे तब्बल १० ते १५ वेळा सोसायटीतील नागरिकांकडून तक्रारी केलेल्या आहेत. राजकीय पुढा-यांच्या दबावापोटी याकडे आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सोसायटीतील नागरिक करू लागले आहेत.

जनतेचे प्रश्न सोडवण्यास आयुक्तांना मिळेना वेळ?

आमच्या मालकीच्या खाणीत राडारोडा, प्लास्टिक, मेटल, स्क्रॅप टाकण्यात येत आहे. हा सोसायटीचा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन्ट असतानाही दादागिरीने काही लोक हे कचरा टाकत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे देखील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीतील नागरिकांकडून तक्रार करण्यात आली. त्यांनी देखील कोणतीही दखल घेतलेली नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास आयुक्तांना वेळ नाही. पण, राजकीय नेत्यांची कामे करायला त्यांना वेळ आहे. यामुळे आयुक्त हे जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांना सर्वाधिक वेळ देऊ लागल्याचे दिसून येत असल्याचे सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.

रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीत तब्बल दीड हजार फ्लॅट आहेत. त्या सोसायटीतील नागरिकांनी एकत्रित येऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सर्व पाणी त्या मालकी हक्कांच्या खाणीत सोडले होते. पण, जनतेची सेवा करणाऱ्या  काही राजकीय पुढाऱ्यांनी दादागिरी करत खाणीत राडारोडा, प्लास्टिक, मेटल, स्क्रॅप टाकला आहे. त्यामुळे महापालिकेने देखील नागरिकांची केलेल्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. सदरील खाणीत टाकलेला कचरा तत्काळ काढून संबंधितांवर योग्य कारवाई करावी.

- विकास साने, अध्यक्ष, रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी, चिखली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest