पिंपरी-चिंचवड: संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडी येथील भक्ती शक्ती स्मारक चौकात दाखल झाली.

संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम घेत वारकरी निगडीत दाखल

टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडी येथील भक्ती शक्ती स्मारक चौकात दाखल झाली.  'ज्ञानोबा माउली, ज्ञानराज  माउली तुकाराम'च्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली होती. यावेळी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख आणि विणेकरी यांचा महापालिकेकडून सन्मान करण्यात आला. वारक-यांना मेडिकल किट भेट देण्यात आले.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात झाला. शनिवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. देहूकरांनी मुख्य कमानीसह पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. देहूगाव येथून सकाळी सातच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत, विणेच्या अखंड झंकारात, 'ज्ञानोबा -तुकाराम'चा जयघोष करीत प्रस्थान पंढरपूरकडे केलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता पालखीचे उद्योगनगरीत आगमन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, साहाय्यक आयुक्त नीलेश भदाने, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, आरोग्यधिकारी यशवंत डांगे आदी जण उपस्थित होते.

कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम घेत वारकरी पिंपरी-चिंचवड शहरात येत होते. त्यांच्या स्वागतासाठी निगडीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात महापालिकेने स्वागत कक्ष उभारला होता. त्यामुळे शहरातील नागरिकही चौकात आले होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पारंपरिक नगारा वाद्याची बैलगाडी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास चौकात आली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. फुलांनी सजवलेला पालखी रथ, सुंदर रांगोळीच्या पायघड्यांवरून आकुर्डीतील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होत सोहळा मुक्कामी पोहोचला. वैष्णवांच्या आगमनाने शहरातील वातावरण वारीमय झाले आहे. 'ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम'च्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा आजचा मुक्काम आहे. रविवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

आकुर्डीत पालखीचा मुक्काम

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी आकुर्डीत मुक्कामी पोहोचला. त्यात सहभागी दिंड्यांची व्यवस्था महापालिकेने शाळांमध्ये केली होती. शिवाय, आपल्या नेहमीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्या विसावल्या. भजन, नामस्मरण आणि जागर यामुळे शहरातील वातावरण वारीमय, भक्तीमय झाले आहे. पालखी सोहळा निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून सायंकाळी शहरात आगमन झाले. मात्र, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू होती. दुपारनंतर वारकरी शहरात यायला प्रारंभ झाला. त्यांना विविध संस्था, संघटनांतर्फे ठिकठिकाणी पाणी, चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. काही संस्थांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून, मोफत औषधे वाटली. काही भाविक वारकऱ्यांच्या पायांची मोफत मालिश करत होते.

दिंडी प्रमुख व विणेकऱ्यांचे महापालिकेकडून स्वागत

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले. देहू संस्थानचे अध्यक्ष, सोहळा प्रमुख व विश्वस्तांसह दिंडी प्रमुखांचे प्रथमोपचार किट, देशी झाडांच्या बिया, माहिती पुस्तिका भेट देऊन सन्मान केला. यावेळी मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, डाॅ. लक्ष्मण गोफणे, यंशवंत डांगे आदी उपस्थित होते. तसेच, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनीही ठिकठिकाणी दिंड्यांचे स्वागत केले.

विविध संस्थांकडून वारकऱ्यांची सेवा

निगडीतील भक्ती-शक्ती स्मारक चौकात पालखी सोहळा आल्यानंतर भक्तांचा अपूर्व उत्साह दिसून आला. सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचे चित्र असून  रिमझिम पावसाच्या सरी आल्या होत्या. खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारे वारकरी, त्यांच्या मुखातून होणारा माउली-तुकोबारायांचा अखंड जप आणि त्यांची सेवा करणारे नागरिक असे वातावरण पिंपरी-चिंचवडमध्ये बघायला मिळाले. आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमन झाले. त्यात सहभागी वारकऱ्यांची सेवा करण्यात शहरातील नागरिकांनी शनिवार सत्कारणी लावला. कुणी पाणी वाटप करत होते. तर, कुणी केळी, बिस्कीट, नाश्ता. काहींनी आरोग्य सेवा केली तर काहींनी पादत्राणे दुरुस्त करून चरणसेवा केली.

शहराचे कारभारी सुट्टीवर, महापूजा कोण करणार? संत तुकाराम महाराज पालखीचे अतिरिक्त आयुक्तांनी केले स्वागत

संत तुकाराम महाराज यांची पायीवारी पालखी सोहळा शनिवारी (दि.२८) शहरात आगमन झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या रविवारी (दि.३०) शहरातून मार्गस्थ होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी राज्यातूनच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह हे दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यापेक्षा त्यांना परदेशातील सुट्टी महत्वाची वाटली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देहू आणि आळंदी येथील आषाढी पायीवारी पालखीचे प्रस्थान होते. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, केंद्रीय मंत्री देहू आणि आळंदीला येतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल होत असतात. शहराचे प्रवेशव्दार समजले जाणाऱ्या निगडीतील भक्ती-शक्ती येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत चऱ्होली फाटा येथे केले जाते. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी आयुक्त हे स्वत: हजर राहत स्वागत करतात. मात्र, यावर्षी आयुक्त हे प्रदीर्घ सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे ही सर्व जबाबदारी अतिरिक्त आयुक्तांना पार पाडावी लागत आहे.

पादुका पूजन कोण करणार?

संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीत मुक्कामी असते. दुसऱ्या दिवशी सकाळची पादुका पुजा ही महापालिका आयुक्त करत असतात. मात्र, आयुक्त सिंह ११ जूनपासून सुट्टीवर गेले आहेत, त्यांची सुट्टी ही शुक्रवारी (दि.२८) पर्यंतच होती. तसेच शनिवार व रविवारी महापालिकेला सुट्टी आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह सोमवारीच रूजू होतील, अशी चर्चा आहे. तर पीएमआरडीचे तत्कालीन आयुक्त महिवाल यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पुजन कोण करणार, असा पेच महापालिका अधिकाऱ्यांसमोर आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest