मी अजितदादांसोबतच-अण्णा बनसोडे
गेल्या दहा वर्षांपासून मी पिंपरी विधानसभेचा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. राज्यात सध्या महायुती आहे. मीही त्याचा एक भाग असून, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणची जागा त्या पक्षाला दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतही हाच फॉर्मुला वापरला गेला होता. मी सुरुवातीपासून अजित पवारांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. अनेक पक्षातून उमेदवारीबाबत मला संपर्क साधला जात आहे. मात्र मी अजित पवारांच्या घड्याळ या चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. (Anna Bansode)
लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील महायुती टिकेल का आणि टिकली तरी आमदार त्याच पक्षातून निवडणूक लढवतील का, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेत भाजपचे दोन आमदार तर राष्ट्रवादीचे एक असे पक्षीय बलाबल आहे. त्याचबरोबर विधान परिषदेसाठी यापूर्वी भाजपकडून उमा खापरे यांना संधी दिली गेली. पिंपरी विधानसभेसाठी भाजपमधून इच्छुक असणारे अमित गोरखे यांना नुकतीच विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे महायुतीकडून पिंपरी विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच सोडली जाईल हे जवळपास निश्चित झाले आहे.
मात्र, लोकसभेच्या निकालातून महायुतीची झालेली पीछेहाट पाहता राष्ट्रवादीमधील अनेक आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. पिंपरीतील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश पातळीवरील शहरातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे हे शरद पवार गटात अथवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा शहरात घडवून आणल्या गेल्या. त्यावर अखेर आमदार बनसोडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मी महायुतीचाच एक घटक असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधूनच आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु महायुती आणि महाआघाडीमधील जागावाटपाबाबत भविष्यात तिढा निर्माण झाल्यास, आमदार अण्णा बनसोडे हे अन्य पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवू शकतात, असेही काही राजकीय जाणकारांचे मत आहे.
महाविकास आघाडीमधून पिंपरी विधानसभेची जागा राष्ट्रवादीलाच सुटणार असल्याने शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याकरिता अनेकांची धडपड सध्या सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटात थांबणाऱ्या पिंपरी विधानसभेतील एकमेव माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित झाली आहे.
महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना, आरपीआयची युती आपण पाहात आहोत. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक असतात. महायुतीमधूनदेखील अन्य घटक पक्षांचे काहीजण इच्छुक होते आणि आहेत. मात्र लोकसभेला जो फॉर्म्युला वापरला गेला तोच फॉर्म्युला विधानसभेलाही वापरला जाणारा असून, ही जागा राष्ट्रवादीची असल्याने मी राष्ट्रवादीमधूनच निवडणूक लढणार आहे. विविध पक्षाचे नेते संपर्क करीत असतात. मात्र, मी अजित पवारांबरोबरच राहणार आहे.
- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.