इंद्रायणी प्रदूषित करणाऱ्यांवर होणार कारवाई
इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या व परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन आळंदी पोलिसांच्या वतीने देण्यात आले. या प्रश्नावर संबंधित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत आळंदी पोलीस ठाण्यात बैठक झाली. त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे आळंदीतील स्थानिक ग्रामस्थ, वारकरी आणि लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले की, इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यात यावेत. तसेच संतभूमी आळंदी येथील गैरप्रकार रोखण्यात यावेत. कष्टकरी कामगार पंचायत व इतर विविध संघटनांच्या वतीने ही मागणी करण्यात आली. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. याबाबत पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणी आळंदी पोलिसांना आदेश दिले. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर आळंदी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रश्नांची व विविध मागण्यांची दखल घेतल्यामुळे व पुढील आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. पोलिसांच्या या सकारात्मक आणि कारवाईच्या आश्वासनामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील महत्त्वाची नदी असलेल्या इंद्रायणीचे वाढते प्रदूषण थांबवावे, याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे देखील बाबा कांबळे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहे. या निमित्ताने आळंदी व परिसरातील विविध प्रश्न, समस्या समोर आल्या. त्यात इंद्रायणीचे प्रदूषण हा प्रश्न देखील समोर आला असून, या प्रश्नांवरती काम सुरू केले आहे. त्या विषयावरती प्रशासन आणि राज्य शासनाकडे देखील पाठपुरावा करणार आहे.
-बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी जनता आघाडी