रावेतमध्ये पदपथ फोडून अतिक्रमण
रावेत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणि रस्ते विकसित होत असताना, दुसरीकडे पदपथ फोडून त्यावरती अतिक्रमण होत असल्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या ठिकाणी लावण्यात आलेली झाडे देखील तोडण्यात येतात. परिणामी, दिवसेंदिवस शहरातील चौक अशाप्रकारे बकाल होत आहेत. यावरती महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प राबवण्यात आले आहेत. अनेक बांधकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे विविध विकासकामे आणि रस्त्याची कामे देखील होत आहेत. मात्र, उभारण्यात आलेले पदपथ तोडून त्यावरती अतिक्रमण होत आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, याबाबत अपेक्षित कारवाई महापालिकेकडून होत नाही. त्यामुळे रावेत परिसरातील चौक भकास होत चाललेले आहेत. हातगाडी , ठेले आणि टपऱ्या उभारण्यात आल्याने त्या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावरतीच वाहने पार्क करतात. परिणामी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. मोठ्या प्रमाणात आणि वेगाने विकसित होत असलेल्या रावेत परिसरात प्रशस्त रस्ते उभारण्यात आले आहेत. त्यातच मोठ्या सोसायट्या आणि शांत परिसरामुळे आयटीक्षेत्रातील मनुष्यबळ तसेच अनेक उद्योजकही वास्तव्यासाठी रावेत परिसराला पसंती देतात. मात्र, अशा बकाल परिस्थितीमुळे रावेत परिसराची लया गेली आहे.
या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेने उभारण्यात आलेले पदपथ तोडून टाकण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लावण्यात आलेली झाड देखील काढून टाकली आहेत. पदपथावर टपरी, हातगाडी आणि स्टॉलदेखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी उभारण्यात आलेले पदपथ बकाल होत असून, नाईलाजास्तव नागरिकांना रस्त्यावरती जीव मुठीत धरून चालत जावे लागते. त्यातच रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकारावर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी रावेतकरणी केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मागितली मदत
पिंपरी-चिंचवड शहराप्रमाणेच रावेत परिसरात देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. दुसरीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यावरती बोलताना दिसत नसल्याने अखेर सुज्ञ नागरिकांनीच कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या गैरप्रकारांवर ॲक्शन घेण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला केली आहे.
पदपथ फोडून अतिक्रमण केले आहे. त्यानंतर आता हळूहळू या ठिकाणी कचरा टाकला जाईल. तसेच, या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्यावर वाहने लावले जातील. परिणामी, वाहतूक कोंडी आणि एकूणच भयंकर स्थिती निर्माण होईल.
-प्रभाकर शिंदे, स्थानिक नागरिक, रावेत