पिंपरी-चिंचवड: संजय गांधी निराधार योजनेसाठी मिळेना पूर्ण वेळ अधिकारी

संजय गांधी निराधार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतात. नागरिकांना याचा लाभ मिळणे आवश्यक असतो. तसेच त्याचा खरा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नायब तहसिलदारांतर्गत कामकाज करणे गरजेचे आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Pankaj Khole
  • Edited By Admin
  • Sat, 6 Jul 2024
  • 01:05 pm
pimpri chinchwad news, Sanjay Gandhi Niradhar Yojana, Naib Tehsildar, PCMC

संग्रहित छायाचित्र

योजनेचा कारभार केवळ एका अव्वल कारकुनावर, अनेक नागरिकांचे अर्ज प्रलंबित

संजय गांधी निराधार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतात. नागरिकांना याचा लाभ मिळणे आवश्यक असतो. तसेच त्याचा खरा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नायब तहसिलदारांतर्गत कामकाज करणे गरजेचे आहे. यासाठी दोन अव्वल कारकून, दोन लिपीक, एक मदतनीस असे किमान पाच कर्मचारी आवश्यक आहेत. मात्र सध्या पिंपरी-चिंचवडमधून एकाच कर्मचाऱ्यावर या कामाचे ओझे टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे येथील कर्मचाऱ्याची वारंवार बदली होत असल्याने परिणामी नागरिकांचे अर्ज प्रलंबित राहत आहेत.

निगडीतील संजय गांधी निराधार योजनेचा कारभार एका अव्वल कारकुनामार्फत चालवला जात आहे. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहत असून, परिणामी त्‍याचा कामकाजावर परिणाम होत आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत आहे. सध्या पिंपरी-चिंचवडमधून एकाच कर्मचाऱ्यावर या कामाचे ओझे टाकण्यात आले आहे. येणाऱ्या अर्जाची संख्या पाहता या कर्मचाऱ्याला काम पुर्ण करताना नाकी नऊ येत आहेत. निराधार व्यक्‍तींना संजय गांधी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्‍कम जमा करून आधार दिला जातो. आकुर्डीत हवेली तहसिल कार्यालय असताना आलेले अर्ज घेऊन कर्मचाऱ्यांना पुण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास उशिर तर होतोच, मात्र कर्मचाऱ्यांचीही हेलपाटे मारून दमछाक होत आहे.

अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी कार्यालयात आले होते. त्या वेळी कर्मचारी जागेवर होता नव्हता. तेथे उपस्थित असलेले अन्य कर्मचारी देखील व्यवस्थित माहिती देत नाहीत. माहिती न मिळाल्यामुळे माघारी यावे लागले.

- संध्या कांबळे, गृहिणी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest