पिंपरी-चिंचवड: अपघात रोखण्यासाठी आरटीओचा पुढाकार
वाढते अपघात रोखण्यासाठी अन् वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत क्रुईसिंग सेफ-ड्रायव्हर्स सेन्स टॅब लॅब' सुरू करण्यात आली आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून आणि आरटीओच्या समन्वयातून हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. त्या माध्यमातून वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देण्यात येत आहे. एका व्हीडीओच्या माध्यमातून वाहतूक नियमन ते रस्त्यावरील चालकाची जबाबदारी अशी जनजागृती सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य आरटीओत राबवण्याचा मानस आहे.
गेल्या वर्षभरात पुणे परिसरात वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी महामार्ग पोलिसांसमवेत आरटीओ विभागदेखील विविध उपयोजना राबवत आहे. त्यानुसार रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत विविध जनजागृती आणि योजनादेखील राबवल्या गेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयअंतर्गत ही लॅब सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोणत्याही अर्जदाराला या चाचणीचे बंधन नाही. मात्र, वाहनचालकांना या चाचणीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम आणि जबाबदाऱ्या सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने या प्रयोगासाठी जागा त्या कंपनीला उपलब्ध करून दिली आहे. मर्सिडीज बेंज आणि भारत केअर्स या माध्यमातून आणि श्री महाकाल एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट यातून 'ड्रायव्हर्स सेन्स टॅब लॅब' सुरू करण्यात आली आहे. ४ मे पासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात साडेपाचशेहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. नवीन शिकाऊ परवानाधारकांना हा अभ्यास उपयोगी ठरणार आहे. कार्यालयात वाहन परवाना संबंधित कागदपत्र व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक केल्यानंतर या ठिकाणी ही चाचणी देता येते. यात साधारण आठ ते दहा मिनिटांचा व्हीडीओ आणि वाहतूक संबंधित माहिती मिळते. चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधित सर्टिफिकेट पुरवले जाते. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिकाऊ परवाना अर्जदारांना ऑनलाइन चाचणीसाठी जाता येते.
दिवसभरात ३० ते ४० अर्जदारांचा सहभाग
आरटीओ कार्यालयात वाहन परवान्यासाठी आलेल्या अर्जदारांना थोडा वेळ असतो. त्या वेळेमध्ये नवीन शिकाऊ परवानाधारकांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी चाचणी घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. दिवसभरातून जवळपास ३० ते ४० अर्जदार ही चाचणी पूर्ण करतात.
अर्जदारांना चाचणीसाठी टॅब पुरवण्यात आले आहेत. त्या माध्यमातून वाहतूक नियमांची माहिती त्यांना मिळते. टेक्निकल सपोर्ट आम्ही पुरवत आहोत. पुणे जिल्ह्यात हा प्रयोग प्रामुख्याने राबवला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांचे यासाठी सहकार्य मिळते.
- तेजस पाटकर, सुपरवायझर, भारत केअर्स
या माध्यमातून वाहनचालकांना रस्ते अपघात कसे टाळले पाहिजेत हे समजून सांगितले जाते. जास्तीत जास्त जणांनी त्यात सहभाग घ्यावा. येत्या काळात नागरिकांचा वेळ विचारात घेता, याची ऑनलाइन लिंक अथवा क्यू आर कोडवर ही सेवा घेण्याचा विचार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वेळेत ती माहिती आपल्या मोबाईलवर अवगत होईल.
- अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड