संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे नागरिक शहरामध्ये वास्तव्यासाठी प्राधान्य देत आहेत. शहरामध्ये सुरू असलेले औद्योगिकीकरण व वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील नागरिकांना मूलभूत पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येत आहेत.
नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध विकास योजनांची अंमलबजावणी केली आहे. शहरातील प्रभाग २५ पुनावळे येथील वाढते उद्योग, नागरीकरणामुळे लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येला दळणवळणासाठी सोयीस्कर रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची बांधणी व दुरुस्ती करण्याची विकास योजना महापालिकेने मंजूर केली आहे. यामुळे प्रभाग २५ मधील नागरिकांना मोठे दुहेरी मार्ग असणारे रस्ते उपलब्ध होणार आहेत, अशी मंजुरी महापालिकेच्या स्थायी समितीकडून देण्यात आली आहे.
‘हे’ रस्ते होणार सुसज्ज आणि रुंद
महानगरपालिकेच्या प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड या भागामध्ये येणाऱ्या रस्त्यांच्या विकास योजनांना महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुंबई-बंगळुरू हायवेपासून काटेवस्तीकडे जाणारा ३०.०० मी. रुंदीचा व २००० मीटर लांबीचा डीपी रस्ता, कोयते वस्ती चौक ते जांभेगावाकडे जाणारा १८.०० मी. रुंदीचा व १३०० मीटर लांबीचा डीपी रस्ता, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड २४.०० मी. रुंदीचा व २५२० मीटर लांबीचा डीपी रस्ता, सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड १८.०० मी डीपी रस्ता त्यासोबतच मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोडपर्यंत जोडणारा वाकड शिवेपर्यंत १८.०० मी रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच, ताथवडे गावातून जीवननगरतर्फे एमटीयू कंपनीकडे जाणारा १८.०० मी रुंदीचा व ८०० मीटर लांबीचा डी.पी रस्ता, बी.आर.टी रस्त्यापासून पुनावळे गावठाणातून जाणारा १८.०० मी रुंदीचा व ११९० मीटर लांबीचा डी.पी रस्ता, वाकड येथील टीपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८.०० मीटर रुंदीचा व ८०० मीटर लांबीचा डी.पी रस्ता व गायकवाडनगरमधील १८.०० मी रुंदीचा व ७६० मीटर लांबीच्या डीपी रस्त्यांची उर्वरित स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वास्तव्य व विविध क्षेत्रातील कामाच्या संधीमुळे नागरिक शहरास प्राधान्य देत आहेत. यामुळे पुनावळेसारख्या वाढत्या नागरीकरण असलेल्या भागामध्ये सुसज्ज रस्ते असणे गरजेचे असून त्यामुळे येथील होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता होणार आहे. प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकास कामांना महापालिकेने मंजुरी दिली आहे. शहरामधील दळणवळणाची स्थिती सुधारणे महापालिकेचे ध्येय असून त्यावर महापालिकेकडून पावले उचलण्यात आली आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका
पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील नागरिकांना दिलासा
प्रभाग २५ पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील रस्त्यांच्या विकास योजनेमुळे प्रभागातील वाहतूककोंडी कमी होणार असून रहिवाशांची सोय होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. जसे की, वाकड भागातील भूमकर चौक व भुजबळ चौकामधील रस्त्याच्या बांधणीनंतर सध्या होणाऱ्या वाहतूक कोंडीस शहरवासीयांना सामोरे जावे लागणार नाही. सदर विविध रस्त्यांच्या विकास योजनांमुळे सुनियोजित पार्किंग व्यवस्था निर्माण होणार आहे. नागरिकांना आरामदायी प्रवास, दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते, सुरक्षित पदपथ (पेडेस्ट्रीयन फ्रेंडली फुटपाथ) उपलब्ध होणार आहेत. सदर रस्त्यांच्या विकास योजनांमुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.