Pimpri Chinchwad: महापालिकेकडून १४२ पैकी ६४ झाडांचे पुनर्रोपण

पिंपरी-चिंचवड: पिंपरीतील नागरिकांची बऱ्याच वर्षांची वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पिंपरी डेअरी फार्म येथील मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु केले आहे.

संग्रहित छायाचित्र

पिंपरीतील उड्डाणपूल तयार करताना तब्बल १४२ झाडे तोडण्यात येणार, वाहतुकीची कोंडी सुटका होण्यासाठी उड्डाणपूलाचे काम हाती

विकास शिंदे: 
पिंपरी-चिंचवड: पिंपरीतील नागरिकांची बऱ्याच वर्षांची वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेच्या (PCMC) वतीने पिंपरी डेअरी फार्म (Pimpri Dairy farm) येथील मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु केले आहे. माञ, हे उड्डाणपूल तयार करताना तब्बल १४२ झाडे तोडण्यात येणार आहेत. यापैकी संरक्षण खात्याच्या जमिनीवर असलेल्या झाडांचे मूल्यांकन करून वृक्ष प्राधिकरण समितीने पुनर्रोपण तसेच वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. यामध्ये मुख्यतः सुबाभूळ, बाभूळ, गुलमोहर आणि रेनट्री या वृक्षांचा समावेश आहे. त्या झाडांमध्ये महापालिकेकडून ६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. (PCMC Tree Cutting News)

दापोडी-निगडी रस्त्याला पॉवर हाऊस चौकाशी जोडणारा हा उड्डाणपूल झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढत्या मागणीला विचारात घेऊन उभारण्यात येत आहे. चार पदरी असणाऱ्या या उड्डाणपुलामध्ये छोट्या वाहनांसह अवजड वाहने पेलण्याचीही क्षमता असणार आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि आसपासच्या भागातील प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल ही पिंपरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. उड्डाणपुल नसल्याने या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आणि रेल्वे फाटकावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर नागरिकांच्या या समस्या दूर होणार असून पुणे मुंबई महामार्गावर तसेच तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलद आणि सहज पद्धतीने प्रवास करण्यासाठी मदत होणार आहे.  या प्रकल्पामुळे परिसरातील हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे. (PCMC Tree Plantation)

१४२ पैकी ६४ झाडांचे करण्यात येणार पुनर्रोपण

वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच वृक्षांचे पुनर्रोपण करून आणि आजूबाजूच्या परिसंस्थेला येणाऱ्या अडचणी कमी करून पर्यावरण विषयक समस्यांचे निराकरण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे महत्व समजून घेऊन बांधकाम प्रक्रियेचा स्थानिक वनस्पती आणि जीवजंतूंवर होणारा परिणाम कमी होण्याच्या दृष्टीने महापालिकेने सक्रीय उपाययोजना केल्या आहेत. संरक्षण खात्याच्या जमिनीवर असलेल्या झाडांचे मूल्यांकन करून वृक्ष प्राधिकरण समितीने पुनर्रोपण तसेच वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. यामध्ये मुख्यतः सुबाभूळ, बाभूळ, गुलमोहर आणि रेनट्री या वृक्षांचा समावेश आहे. तसेच महापालिकेच्या वतीने ६४  झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

शहराच्या विकासात तसेच नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये भर घालणारा प्रकल्प आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल हा शहराच्या निरंतर विकासाला पाठिंबा देणाऱ्या महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या महापालिकेच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. येत्या काही महिन्यांत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथील रहिवासी कमी वेळेत सुधारित दळणवळण तसेच शाश्वत शहरी वातावरणाचे साक्षीदार होऊ शकतात.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest