संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
पिंपरी-चिंचवड: पवना धरण क्षेत्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे किवळे परिसरात पाण्याच्या टाक्यांमधील शिल्लक असलेल्या साठ्यातून पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. मात्र, आलेल्या पाण्यात लाल अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे किवळेच्या विकासनगर, मोरया काॅलनीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Pimpri Chinchwad)
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून दररोज ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, पवना धरणात २२ फेब्रुवारी रोजी अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे रावेत बंधारा या ठिकाणी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. रावेत नदीपात्रात कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अनेक भागात सायंकाळी आणि सकाळचा होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहिला होता.
किवळे परिसरातील विकासनगर, दत्तनगर, बापदेवनगर, आदर्शनगर, किवळेगाव, साईनगर, मामुर्डी भागात पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत झाला होता. या भागातील विकासनगरमधील मोरया काॅलनीत पिण्याच्या पाण्यात लाल अळ्या आढळून आल्या. या भागातील सुज्ञ नागरिकांनी माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्याकडे आपली तक्रार मांडली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलटाक्यांची योग्य साफसफाई होते का, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्यात विकासनगरसह अन्य काही भागात सूक्ष्म लाल अळ्या आढळून आल्या आहेत. निगडीच्या सेक्टर २३ मधून जलशुद्धीकरण प्रकल्पातून हे पाणी पुरवले जाते. मात्र, किवळे भागातील पिण्याच्या पाणी असलेल्या जलटाक्यांची साफसफाई होते की नाही, त्या भागात पाण्याची गळती होऊन पिण्याच्या पाण्यात हे पाणी मिसळत तर नाही ना? असा अनेक सवाल नागरिक करत आहेत. पाण्यातील लाल अळ्यांमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्यातील लालसर अळ्या आणि पिवळसर दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. कावीळ व अतिसारसारखे आजार उद्भवू शकतात. दूषित पाण्यामुळे कावीळची बाधा होते. ताप, उलट्या, जुलाब होऊन अशक्तपणा येतो. दूषित पाण्यामुळे अतिसार होतो. जुलाब होऊन ताप येतो. त्यामुळे किवळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग लक्ष देणार का, असा सवाल उपस्थितीत होत आहे.
विकासनगर भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गढूळ आणि पिवळसर पाणी येत आहे. काही वेळा पिण्याच्या पाण्याचा वास देखील येत आहे. तर पिण्याच्या पाण्यात लालसर जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत.
- प्रियंका माने, स्थानिक तक्रारदार महिला
किवळे परिसरात पिण्याच्या पाण्यात लाल अळ्या आढळून आल्या आहेत. अनेकदा पाणी गढूळ येते, कधी तर पाण्यात वेगवेगळे किडे देखील येतात. महापालिकेने दिलेल्या वेळेत कधी नागरिकांना पाणी मिळत नाही. सकाळी आठ ते अकरा पाणी सोडण्याची वेळ आहे. पण, दुपारी एक ते दोन नंतर पाणी सोडले जाते. तेव्हा घरात कोणीच नसते. कारण, तेथील अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर गेलेले असतात. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या अंदाधुंद कारभाराने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करणार आहे.
-प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेविका, किवळे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.