पिंपरी-चिंचवड : विनाअर्ज होणार मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया

पिंपरी-चिंचवड : शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पूर्ण झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Oct 2024
  • 12:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नोंदणी व मुद्रांक विभागाचे करसंकलन संगणक प्रणालीशी एकात्मीकरण, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि सुलभीकरण

पिंपरी-चिंचवड : शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता नोंदणी व मुद्रांक विभागाच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबतच्या दस्तांबाबत अद्ययावत माहिती संगणक प्रणालीच्या माध्यमातून पिंपरी- चिंचवड  महापालिकेला ११ ऑक्टोबर २०२४ पासून उपलब्ध होत आहे. यामुळे आता मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रियाही तत्काळ होणार आहे.

मालमत्तेची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण होणारा विलंब यापुढे टाळला जाऊन मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया गतिमान होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत मालमत्तांसंबधी नव्या मालमत्तांची कर आकारणी करून कर वसूल करणे हे कर संकलन विभागाचे काम आहे. यासह मालमत्तेच्या संबंधित योग्य व्यक्तीच्या नावावर हस्तांतरण करण्यात येते. १५ व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागास आपल्या विभागाची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मनपा आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचे संगणक प्रणालीशी एकात्मीकरण (इंटिग्रेशन) पूर्ण झाले आहे. त्यामुळे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री झाल्यानंतर सदर मालमत्तेचे हस्तांतरण होणारा विलंब यापुढे टाळला जाऊन मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया लवकर होणार आहे.

सदरची प्रक्रिया ऑनलाइन सेवेद्वारे आपोआप होणार असल्यामुळे नागरिकांना मालमत्ता हस्तांतरणासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणासाठी अर्ज केला नाही तरी हस्तांतरण प्रक्रिया आपोआप विहित मुदतीत पार पडणार आहे.

याकरिता शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता विक्री करणार, मालमत्ता खरेदी करणार, मालमत्ता नोंदणी दिनांक व मालमत्तेचा व्यवहाराचा तपशील प्राप्त होणार आहे.

अशी राबवणार प्रक्रिया
महानगरपालिका सर्वप्रथम मालमत्ता विक्री करणाऱ्याचे नाव, खरेदी करणाऱ्याचे नाव, विक्री मालमत्तेचा संपूर्ण तपशील तपासणार आहे. उपरोक्त तपशील अचूक भरल्याची खात्री झाल्यानंतर मालमत्तेचे बाजारमूल्य अथवा मुद्रांक शुल्क ज्या रकमेवर भरणा केले आहे यापैकी जी रक्कम सर्वोच्च असेल त्या रकमेवर ०.५० टक्के इतके मालमत्ता हस्तांतरण शुल्काची आकारणी करून मालमत्ताधारकांस हस्तांतरण शुल्काची एकूण रक्कम ऑनलाइन स्वरूपात भरणा करण्यासाठीची लिंक एसएमएसद्वारे पाठवण्यात येणार आहे. मालमत्ताधारकांनी त्यांना प्राप्त एसएमएसद्वारे मालमत्ता हस्तांतरण शुल्काची रक्कम तत्काळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरणा करावी. याबरोबरच, मालमत्ताधारकांना हस्तांतरण शुल्काच्या रकमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास मालमत्ता कराच्या पुढील बिलामध्ये हस्तांतरण शुल्काचा समावेश करण्यात येणार आहे. याचबरोबर, यापुढे ज्यांना मालमत्ता खरेदी अथवा मालमत्ता विक्री करावयाची आहे अशा नागरिकांनी मालमत्तेच्या दस्ताची नोंद करतेवेळी आपला मालमत्ता क्रमांक नमूद करावा, असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक विभागाचे महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या संगणक प्रणालीशी एकात्मीकरण करण्याचे १५ वित्त आयोगाने निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही विभागाच्या संगणक प्रणालींचे एकात्मीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून मालमत्तेच्या खरेदी व विक्री बाबतची इत्थंभूत माहिती विभागाला मिळण्याससुध्दा सुरुवात झाली आहे. सदर प्रणालीमुळे विभागाच्या प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता निर्माण होऊन हस्तांतरणाच्या  प्रक्रियेमध्ये विलंब न लागता ती प्रक्रिया सुलभ होणार आहे. 
- अविनाश शिंदे, साहाय्यक आयुक्त, कर संकलन विभाग, महापालिका

नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मालमत्ता हस्तांतरण प्रणालीमध्ये बदल करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबध्द असून सदर प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचवून त्यांना जलद सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

Share this story

Latest