पिंपरी-चिंचवड पोलीसांना अखेर मिळाले 'श्वान'
लक्ष्मण मोरे
अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि अमली पदार्थ तसेच बॉम्ब शोधक पथकासाठी पुणे पोलिसांकडून दोन श्वान देण्यात आले आहेत. 'सिम्बा' आणि 'जेम्स' अशी या श्वानांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांची अनेक महिन्यांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. थेट पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी घेऊन श्वानांचे हे हस्तांतरण बुधवारी पार पडले. या संदर्भात रखडलेल्या प्रक्रियेबाबत 'सीविक मिरर' ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण झाली.
पुणे पोलिसांकडून या श्वानांना गुरुवारी निरोप देण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत त्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पोलिसांची एक गाडी आकर्षक पद्धतीने फुलांनी सजवून, त्यामध्ये हे श्वान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांना औक्षणदेखील करण्यात आले. त्यांना निरांजन तबकाने ओवाळण्यात आले. या श्वानांची तात्पुरती व्यवस्था देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्रपणाने करण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडील दोन पोलीस कर्मचारी 'डॉग हँडलर' म्हणून काम करणार आहेत. त्यांनी 'डॉग हँडलिंग' चे प्रशिक्षण घेतलेले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये दोन विभागात हे दोन श्वान काम करणार आहेत. एक श्वान मालमत्ता आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासासंबंधी काम करणार आहे, तर दुसरे श्वान अमली पदार्थ तपासणी आणि बॉम्बशोधक व नाशक पथकासाठी 'स्निफर डॉग' म्हणून काम करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाला गंभीर गुन्ह्यांच्या वेळी किंवा संशयास्पद हालचालींसंबंधी पाचारण केले जात होते. पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देखील ही दोन पथके असावीत यासाठी पोलीस महासंचालकांकडे परवानगी मागण्यात आली होती. परंतु, तूर्तास ही गरज भागवण्यासाठी पुणे पोलिसांकडून दोन श्वान घेण्याची परवानगी द्यावी, असे पोलीस महासंचालक कार्यालयाला कळविण्यात आले होते. पोलीस महासंचालकांनी देखील त्याला 'पुणे शहर पोलिसांनी दोन श्वान दिल्यास जरूर घ्यावेत' असा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पुणे पोलिसांकडे दोन श्वान मागण्यात आले होते. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून त्यांच्याकडे श्वान पथक व बॉम्बशोधक व नाशक पथक नसल्याने या संबंधीच्या कामांवर पुणे पोलिसांवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे पोलिसांकडे श्वान पथकातील दोन श्वान देण्याची मागणी केली होती. याबाबत पत्रव्यवहार मागील महिन्यात करण्यात आला होता. मात्र, पुणे पोलिसांनी सुरुवातीला त्याला नकार दिला होता. पुन्हा पिंपरी पोलिसांनी याबाबतची मागणी सुरू केली होती. त्यामुळे पिंपरी -चिंचवड पोलिसांची कोणी 'डॉग देता का डॉग' अशी अवस्था झाली होती. या मागणीला काही अधिकाऱ्यांनी नकारात्मक शेरे दिले होते. परंतु, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मागणीबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार सकारात्मक होते. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
श्वानांचे हस्तांतरण झाल्यामुळे पुण्याच्या श्वान पथकावर असलेला अतिरिक्त ताण कमी होणार आहे. त्यामुळे या पथकांना चाकण पासून देहूरोडपर्यंत जाण्याची आवश्यकता उरणार नाही. निकडीच्या वेळी दोन्ही आयुक्तालय एकमेकांना मदतीसाठी सज्ज असणार आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द 'पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची प्रतीक्षा आता संपली असून नव्याने दोन जिगरबाज अधिकारी दाखल झाले आहेत.' अशा शब्दात ट्विट करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरू होताना श्वान पथक आणि बॉम्बशोधक नाशक पथकाला स्वतंत्रपणे मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे पोलीस महासंचालक यांच्या परवानगीने पुणे आयुक्तांकडे आम्ही श्वान मिळावेत यासाठी विनंती केली होती. पुणे शहर पोलीस दलाकडे असलेले दोन श्वान मिळाले असून, यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासाला आता मदत होणार आहे.
- स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे / मुख्यालय)
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.