संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: शहरातील १३ तलावांपैकी ६ बंद होते. दरम्यान, त्यापैकी एक तलाव गुरुवारपासून सुरु होणार असून, येत्या दोन दिवसात आणखी एक तलाव सुरू होणार आहे. इतर बंद असलेल्या तलावाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, अशी माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
'सीविक मिरर'ने 'उन्हाळ्याच्या तोंडावर स्विमिंग टॅक बंद' या मथळ्याखाली २५ फेब्रुवारी मध्ये सविस्तर वृत्त दिले होते. त्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणी आणि महापालिकेचे कामकाज यावर प्रकाश टाकला होता. महापालिका प्रशासनाने तातडीने त्याची दखल घेत, बंद असलेले तलाव सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला. क्रीडा विभागाच्या स्थापत्य विभागास पत्रव्यवहार देखील करण्यात आला. तसेच, आयुक्तांना देखील तलाव सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. अखेर आयुक्तांनी बंद असलेल्या तलावांपैकी काही तलाव सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली.
त्यानुसार गुरुवारपासून जुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या जलतरण तलावावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व जलतरण तलावांसाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग/पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तलावाची वेळ सकाळी ६ ते ०९.४५ व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. उन्हाळी शिबीर सुविधा सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत असणार आहे. या जलतरण तलावावर लहान मुलांसाठी बेबी टॅंकची देखील सुविधा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मेस्को या संस्थेमार्फत जीवरक्षक तथा सुरक्षा अधिकारी आणि व्यवसथापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
इतर दोन तलाव लवकरच होणार सुरू
सध्या बंद असलेल्यापैकी यमुनानगर तलाव सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच निगडी आणि भोसरी तलावाचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू असून, त्या कामाचा आढावा क्रीडा विभागाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, ज्येष्ठ अधिकारी थेट महापालिका आयुक्तांकडे तलाव बंद असल्याचे तक्रारी केल्या होत्या. तसेच, काही सामाजिक व राजकीय संघटनांना देखील निवेदन दिले होते.
जुनी सांगवी येथील तलाव सुरू केला असून, इतरही तलाव काही दिवसातच सुरू होतील. त्याबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. - मिनीनाथ दंडवते, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.