Pimpri Chinchwad News: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रक्षक चौकात भुयारी मार्ग

सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

भुयारी मार्गासाठी पाच कोटी ७३ लाख खर्चास मान्यता

सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

सांगवी आणि औंध जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत-किवळे बीआरटी मार्ग सुरू होतो. या रस्त्याचे दहा वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरण करून बीआरटी मार्गिका, मुख्य मार्ग व सेवा रस्ता निर्माण केला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांतच पदपथांसह सायकल मार्ग उभारून कडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरणही केले जात आहे. या रस्त्याने वाय जंक्शन येथून वाकड, हिंजवडी, मुंबई-बंगळुरू महामार्गाला जाता येते. साई चौकातून, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरी, पुणे-मुंबई व पुणे-नाशिक महामार्गावर जाता येते. काळेवाडी फाटा येथून वाकड व काळेवाडी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि डांगे चौक थेरगाव येथून चिंचवड, वाल्हेकरवाडी मार्ग प्राधिकरणात जाता येते. ताथवडे, पुनावळे, रावेत हा नव्याने विकसित भागही या रस्त्याने जोडला गेला आहे.

पिंपळे निलखमधून बाणेर, बालेवाडी भागातही जाता येते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीतील कर्मचारी रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते गावठाणात संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारा रस्ता १८ मीटर रुंद आहे. हा दुहेरी मार्ग असून, दुभाजक आहे. दोन्ही बाजूने पदपथ असून, संरक्षक भिंत आहे. या १८ मीटर रस्त्यास भुयारी मार्ग उभारण्यासाठी सात कोटी ६२ लाख आठ हजार २१३ रुपये दराची निविदा प्रक्रिया महापालिकेने राबवली होती. सर्वांत कमी पाच कोटी ७३ लाख १० हजार ८०६ रुपये दराची निविदा एचसी कटारिया कंपनीची होती. त्यांच्याशी करारनामा करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिल्याने भुयारी मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

सांगवी-रावेत बीआरटी मार्गावर रहदारी वाढली आहे. रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन आहे. रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल.

- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest