केबल टाकण्यासाठी रस्त्यांची लावली वाट
विकास शिंदे
पिंपरी चिंचवड: महापालिकेच्या (PCMC) स्थापत्य प्रकल्प विभागांत नियोजन नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी फूटपाथ आणि रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या टेल्को रोडवरील केएसबी चौक ते लांडेवाडी रस्त्यावर केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे. यामुळे डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची वाट लागली असून पुन्हा रस्त्यावर खड्डे तयार होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Pimpri Chinchwad Potholes)
निगडी ते भोसरी टेल्को (Nigdi - Bhosari Telco Road) रस्त्यावर सतत वर्दळ असते. विशेषतः याच रस्त्यावरून टाटा कंपनीच्या कामगारांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. हा रस्ता भोसरी व चाकण एमआयडीसीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. येथून अवजड वाहनांसह इतर वाहनांचीही सतत वर्दळ असते. पीएमपीएमएल बसचा समावेश आहे. एका खासगी कंपनीचे रस्त्याच्या कडेला भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू आहे. हे काम करण्यासाठी महावितरणकडून खोदकामाला सुरुवात झाली आहे. खोदकामामुळे नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे नुकसान झाले असून वाहनचालकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने टेल्को परिसरातील केएसबी चौक ते यशवंतनगर या रस्त्याचे दोन महिन्यांपूर्वीच डांबरीकरण केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फूटपाथ देखील तयार केले होते. तर यशंवतनगर ते लांडेवाडी पर्यंत 'क' क्षेत्रीय कार्यालयाने रस्ता खोदण्यास परवानगी दिलेली आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. सतत वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. खोदकामानंतर त्यावर व्यवस्थित डांबरीकरण करणे आवश्यक असते. पण, खोदकाम करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात.
शहरात विविध सेवा वाहिन्या, केबल टाकण्यासाठी खोदकाम करणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामात नियोजन न केल्याने रस्त्यांची वाट लागत आहे. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण कामे सुरु झाली. परंतु काही दिवसांतच हे रस्ते पुन्हा खोदले जात असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
स्त्यांच्या खोदकामामुळे वाढले अपघातांचे प्रमाण ?
शहरात जलवाहिनी, गॅस वाहिनी तसेच केबल टाकण्यासाठी या अगोदर तीन वेळा रस्ता खोदला. आता पुन्हा रस्त्याची खोदाई केली आहे. अनेक भागात रस्ते खोदाई केल्यानंतर ठेकेदार ते चारी मातीने मुजवून तसेच निघून जातात. त्यानंतर वाहनाच्या ये - जा झाल्यावर मोठा खड्डा पडून वाहने यामध्ये आदळून अपघात होण्याची दाट शक्यता असते. खड्ड्यांमुळे तसेच परिसरात पसरलेल्या खडीमुळे वाहने घसरूनही सतत अपघात होतात, यापूर्वी रस्त्याच्या खोदकामानंतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तळवडे चौकाजवळ झालेल्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रस्ता वारंवार न खोदता रस्त्यावरील कामे एकदाच पूर्ण करावीत. व्यवस्थितरीत्या डांबरीकरण करून दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नियोजनशून्य कारभार सुरुच
रस्ते खोद्काम करताना बॅरिगेट लावून, कामाची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक आहे, पण ही माहिती दिली जात नाही. खोदकाम आणि त्यानंतरची दुरुस्ती, नव्याने डांबरीकरण करणे या कामांचे नियोजन करण्यासाठी संबंधित स्थापत्य विभागाकडून नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकणे, महावितरण, विविध मोबाईल कंपन्या, एमएनजीएल, पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, यासह विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्यांची वाट लावली जात आहे. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. खोदकामानंतरचे नियोजन नसल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेने टेल्को रोडवरील केएसबी चौक ते लांडेवाडी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीची केबल टाकण्यासाठी महावितरणकडून केबल टाकण्यात येणार आहे. रस्ते खोदकाम करण्यासाठी पैसे भरुन घेतले आहेत. त्यानंतर परवानगी दिलेली आहे. त्यामुळे नुकतेच डांबरीकरण केले असले तरीही विकासकामे अडवता येत नाहीत. म्हणून रस्ते खोदकामाला परवानगी दिली असून केबल टाकल्यानंतर रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात येईल.
- प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता, स्थापत्य विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.