निवासी डाॅक्टरांना नातेवाईकांची मारहाण
महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (Yashwantrao Chavan Memorial Hospital) अत्यावश्यक विभागात सोमवारी (४ मार्च) पहाटे रुग्णांच्या नातेवाईकांना दोन निवासी डाॅक्टरांना मारहाण केली. आक्रमक झालेल्या डाॅक्टरांनी नातेवाईकांच्या अंगावर धावून जात मध्यस्थीस आलेल्या पोलिसांना देखील धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षेचा मुद्दा पुढे करत निवासी डाॅक्टरांनी सकाळी आठ वाजल्यापासून तब्बल दहा तास रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार रोखून धरत संप पुकारला आहे. दरम्यान, वायसीएम विभाग प्रमुखांनी निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना अधिक सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) वायसीएम रुग्णालयात अत्यावश्यक विभागात सोमवारी (४ मार्च) पहाटे तीन ते चारच्या सुमारास मोशीतील नॉरमन आरलेन हे त्याच्या तीन मुलींना घेऊन ते वायसीएम रुग्णालयात आले होते. या मुलींना मारहाण झाली होती. त्यापैकी एका मुलीच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने तिचा सीटी स्कॅन करणे आवश्यक वाटल्याने तेथे इमर्जन्सी वॉर्डमध्ये असलेले डॉक्टर नरेश शिवानंद अंजनादेवी (वय २५) यांनी त्यांना तसा सल्ला दिला. मात्र, नाॅरमन आरलेन यांनी सीटी स्कॅन करण्यास नकार दिला. तातडीने एमएलसी पेपर्स द्या आणि जखमांचे स्वरूप वाढवून लिहून द्या, असे सांगत गोंधळ घालून डॉक्टर नरेश आणि डॉक्टर अथर्व यांना धक्काबुक्की करत हाताने मारहाण व शिवीगाळ केली. माझी आमदाराशी ओळख आहे. उद्या तुम्हाला बघून घेतो,अशी धमकी दिली. (YCM Hospital News)
त्यामुळे नरेश शिवानंद अंजनादेवी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार नॉरमन लायरस आरलेन (वय ४८) आणि शरवीन नॉरमन आरलेन (वय २३) यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, रुग्णालयात निवासी डाॅक्टरांना मारहाण झाल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशव्दार रोखून धरत आंदोलन केले. १४८ डाॅक्टर या संपात सहभागी झाले. दरम्यान, वायसीएम रुग्णालयाचे विभाग प्रमुख डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी निवासी डाॅक्टरांशी चर्चा करून आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. निवासी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना अधिक सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल. तसेच अत्यावश्यक विभागात रुग्णांबरोबर एक किंवा दोन नातेवाईकांना प्रवेश दिला जाईल. या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार निवासी डाॅक्टरांनी सायंकाळी ५ वाजता संप मागे घेतला आहे. (Resident doctors are beaten by relatives in ycm hospital)
सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ
वायसीएम रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा सर्वत्र कार्यान्वित आहे. रुग्णालयाच्या अत्यावश्यक विभागाशेजारी पोलिसांचीही केबिन आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावलेला आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डाॅक्टरांना मारहाण केली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी नातेवाईकांना ताब्यात घेत त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले.पोलीस डाॅक्टरांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मारहाणीमुळे निवासी डाॅक्टरदेखील आक्रमक झाले. ते पोलिसांच्या केबिनमध्ये जाऊन नातेवाईकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निवासी डाॅक्टर पोलिसांनाही धक्काबुक्की करत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज संबंधित विभाग प्रमुखांनी तपासले नाही. तसेच या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे पोलीस आणि डाॅक्टरांची बदनामी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज दिले जात नसल्याची चर्चा वायसीएम रुग्णालयात सुरू होती.
निवासी डाॅक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांचा संप सुरू होता. त्या डाॅक्टरांचा मागण्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार डाॅक्टरांना सुरक्षा व्यवस्था अधिक पुरवण्यात येईल. रुग्णाच्या नातेवाईकांना अत्यावश्यक विभागात सोडण्यात येणार नाही. एक किंवा दोन नातेवाईक रुग्णाबरोबर जातील. यासह विविध मागण्यांचे निवेदन डाॅक्टरांनी दिले. आता डाॅक्टरांनी संप मागे घेतला असून वैद्यकीय यंत्रणेवर कुठलाही परिणाम झाला नाही.
-डॉ. अभयचंद्र दादेवार, विभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय, महापालिका.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.