Pimpri Chinchwad News: प्रदूषण वाढले, श्वास कोंडला!

पिंपरी-चिंचवड: शहरातील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला नुकतीच आग लागली होती. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते.

Pimpri Chinchwad Pollution

संग्रहित छायाचित्र

आगीच्या गंभीर घटना वाढल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक, औद्योगिक कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई कधी?

- विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड: शहरातील मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला नुकतीच आग लागली होती. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. मात्र, ही आग दोन दिवस धुमसत होती, त्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला असून प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. यामुळे  पर्यावरण प्रेमी, नागरिक सोमवारी पालिका आयुक्तांना भेटणार आहेत. (Pimpri Chinchwad Pollution News)

मोरवाडी न्यायालयाच्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटीजवळ प्रचंड मोठी आग लागली होती. तेथील मोकळ्या जागेवर रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले होते. टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली होती. ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोटदेखील झाला.

त्या मैदानात औद्योगिक कचरा टाकून साठा तयार केला होता. या कचऱ्याला आग लागली. आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती. धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीला दोन दिवस उलटल्यानंतरही परिसरातील मासुळकर कॉलनी, अजमेरा, एम्पायर इस्टेट, ऑटो क्लस्टर आणि मोरवाडीमध्ये प्रचंड धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे हवा अशुध्द होऊन प्रदूषण पातळीदेखील वाढली आहे. शहरात वारंवार अनेक भागात कचरा देखील जाळला जात आहे. याकडे आरोग्य व पर्यावरण विभाग कोणतीही कारवाई करत नाही. आरोग्य व पर्यावरण विभागाचे पथकदेखील कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे दंडात्मक कारवाई थंडावली आहे.

मोरवाडीतील औद्योगिक कच-याला लागलेली आग प्रचंड होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला, तरी आग जास्तच वाढत होती. त्यानंतर फोमचा मारा करण्यात आला. त्यामुळे आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र फोमचा प्रभाव कमी झाला की आग परत सुरू होत होती. त्यामुळे त्यावर माती टाकून आग नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाढत्या धुराने आरोग्य धोक्यात

औद्योगिक कच-याला लागलेल्या आगीचा धूर पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या धुराचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती महिलांना होत असल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. या आगीत रबर, प्लास्टिक साहित्य जळाल्याने त्यातून निर्माण झाल्याने धुराचा उग्र वास नागरिकांना सहन करावा लागला.

झाडे जळाली

औद्योगिक कच-याचा ज्या ठिकाणी साठा होता. त्या जागेवर प्रचंड वृक्ष संपदा होती. पलीकडे पालिकेचे आयटीआय काॅलेज आहे, न्यायालय परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती. तसेच आयटीआय काॅलेज विद्यार्थ्यांनीदेखील परिसरात झाडांची लागवड केलेली होती. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. दोन दिवस आग धुमसत होती. त्यामुळे १५ ते २० मोठी आणि काही लहान झाडे आगीने होरपळून गेली. या आगीने हिरवीगार झाडे भस्मसात झाल्याची भावना पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.  

भंगार दुकानावर कारवाई करा

चिखली - कुदळवाडी- मोशी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात भंगार मालाची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांना वारंवार आगी लागतात. रसायनमिश्रित पिंप धुतली जातात, त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु, या दुकानांवर कारवाईच होत नसल्याने या अनधिकृत दुकानांनी सर्व परिसर व्यापला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांना श्वास घेणेही मुश्‍कील होईल. त्यामुळे नागरी वस्तीतील दुकानावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पर्यावरण, आरोग्यासाठी आयुक्तांना नागरिक भेटणार

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पर्यावरण व आरोग्य प्रश्नासंर्दभात पर्यावरण प्रेमी व नागरिक उद्या (सोमवार, दि. २६ ) दुपारी ३ वाजता भेटणार आहेत. यामध्ये पवना, इंद्रायणी नदी प्रदूषण, अवैध वृक्षतोड व कार्यवाहीसाठी टाळाटाळ, औद्योगिक कचरा अवैध साठवणूक व जळून वायुप्रदूषण, अर्धवट बीआरटीमुळे वाहतूक कोंडी व वायुप्रदूषण, रस्त्यावरील झाडांना लायटिंग व खिळे लावणे, आणि शहरातील सर्वत्र वाहणारी उघडी गटार यासह अन्य विषयांवर ठोस भूमिका घ्यावी म्हणून भेटणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest