संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका ( क्षेत्रात रविवारी (दि. ३) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम (Pulse Polio Vaccination Campaign) राबविण्यात येणार आहे. यावेळी शहरातील पाच वर्षांच्या आतील दोन लाख ४० हजार बालकांना डोस दिला जाणार असून यासाठी वैद्यकीय विभागाने जय्यत तयारी केली आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा आढावा घेण्यात आला आहे. मोहिमेसाठी शहरात एक हजार पोलिओ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. तसेच यासाठी ४ हजार कर्मचारी काम करणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविली जाते. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन केले आहे. (Pimpri-Chinchwad Municipal Corporation)
रविवारी (दि. ३) सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही मोहीम राबविली जाईल. मोहिमेत जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील, त्यांना ४ ते ८ मार्च दरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे डोस दिला जाईल, अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली.
लसीकरण मोहिमेस सज्ज
पिंपरी-चिंचवड मनपा परिसरामध्ये केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार रविवार ३ मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम होत आहे. या मोहिमेत ३ मार्च रोजी बूथवर सकाळी ८ ते सायं ५ यावेळेत पोलिओ लसीकरण करण्यात येईल. मनपा परिसरात ११०९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ७५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २५५ पर्यवेक्षक व ३२०३ लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे विविध स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
मुलांसाठी ८१ फिरती केंद्रे
महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी एकूण ११०९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९६३ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी ५४ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणी ८१ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटिंग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे.
रविवारी पल्स पोलिओ डोस देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी विविध भागांत एक हजार बूथ उभारण्यात येणार आहेत. तसेच चार हजार कर्मचारी डोस देण्यासाठी फिल्डवर असणार आहेत. ज्या नागरिकांच्या घरी पाच वर्षांखालील बाळ आहे, त्यांनी जवळच्या केंद्रावर बाळाला डोस देण्यासाठी न्यायचे आहे. तसेच जवळील नागरिकांना याची माहिती द्यावी.
— डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.