...आता वर्षा बंगल्यासमोर वडापाव विक्री
पंकज खोले
राज्यातील पथारी, हातगाडी, स्टॉलधारकांवर विविध महापालिका क्षेत्रात पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यांच्यावर दंडेलशाही पद्धतीने कारवाई होते. याचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर फेरीवाले वडापाव विकणार आहेत. तसेच भाजीपाल्यासह अन्य वस्तूही विकणार असल्याचा निर्णय रविवारी बैठकीत घेण्यात आला. तसेच प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे चिंचवड येथे आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते.
यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रदेश संघटक अनिल बारवकर, निमंत्रक किरण साडेकर, नाना कसबे, समाधान जावळे, बालाजी लोखंडे,अमोल घुगे,राजू पठाण, युवराज मिळवणे, सलीम शेख, शंकर भंडारी, अंबालाल सुकवाल,आसिफ शेख, सुरेश नवगिरे ,के प्रसाद, अक्षय नवगिरे, योगेश लोंढे, मनोज यादव आदी उपस्थित होते.
फेरीवाला व्यवसाय संरक्षित व्यवसाय करण्यासाठी २०१४ मध्ये पथ विक्रेता कायदा करण्यात आला. हा कायदा होऊन दहा वर्षे झाले तरीही अजून फेरीवाल्यांवर अन्याय सुरू आहे.
स्मार्ट सिटी, अर्बन सीटीच्या नावाखाली करोडो रुपयांचा चुराडा करण्यात येत असून शहरांच्या उभारणीत योगदान असणाऱ्या पथ विक्रेत्यांना बाजूला करण्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे. देशाचे पंतप्रधान देशातील फेरीवाल्यांना मदत केल्याचे सांगतात. मात्र, त्यांना कर्ज स्वरूपात दिलेल्या मदतीचे श्रेय घेत आहेत. त्यांनी कायदा अमलात आणावा, फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांचा जागर यावेळी करण्यात येणार आहे.
भाजपचा अन्याय
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावाच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवरच रोखण्यात आले. दोन दिवसांत २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ड्रोनद्वारे अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, बॅरिकेडसह सिमेंटचे गट्टूही बसवण्यात आले. हे सर्व अडथळे पार करून शेतकरी या आंदोलनात यशस्वी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी संघटनेने व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर सरकारकडून मोठा अन्याय होत असून आजही महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. नापिकी व दुष्काळामुळे अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत याचा जाब सरकारला विचारेल, असेही नेत्यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.