संग्रहित छायाचित्र
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड येथील एसटी स्थानक परिसरात दारू पीत बसलेल्या चौघा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. धाराशिव विभागाचे कळंब आगाराचे ते वाहक व चालक होते. त्या संदर्भात चौकशी करून ही कारवाई करण्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर येथील आगारात कळंब आगाराचे चार कर्मचारी विश्रांतीगृहात थांबले होते. दरम्यान, पुणे विभागाचे अधीक्षक यांनी केलेल्या पाहणीत ते चौघेजण दारू पीत असताना सापडले. या प्रकरणी एसटी प्रशासनाने त्वरित कारवाई करून या संदर्भात पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. तसेच, संबंधित वाहक व चालक नेमणुकीस असलेल्या धाराशिव विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील त्याची माहिती पाठवली आहे. त्यानुसार त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू असून, चौघांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. मात्र, त्याबाबत अद्याप प्रस्ताव दिला नाही.
धाराशिव विभागाचे एसटी प्रशासनाचे अधिकारी अभय देशमुख यांनी सांगितले की, पुणे विभागाकडून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या संबंधित प्रस्ताव केला असून तो वरिष्ठांकडे सादर केला आहे. त्या संबंधित येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यासह सर्वच विभागातील परिसर तसेच, विश्रांतीगृह याची पाहणी करण्याबाबत सूचना प्रत्येक आगार प्रमुखांना एसटीच्या प्रमुखांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील आणखी वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
चोरताना पकडले
वल्लभनगर येथील एसटी स्थानकात पार्क केलेल्या बसच्या केबिनमधून साहित्य चोरताना रिक्षा चालकाला येथील तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले. मार्गावर एसटी धावताना चाक पंक्चर झाल्यास, व्यवस्था म्हणून आगाराकडून जॅक व त्याचे इतर साहित्य पुरवण्यात येत असते. दरम्यान, बुधवार रात्री एका रिक्षातून आलेल्या चालकाने चार बसमधून ते जॅक चोरले. मात्र, तेथील तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला संशयास्पद वाटल्याने हटकले. त्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांना ताब्यात दिले असून, या परिसरात रात्र गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.