एसटी आगारातच चालक-वाहकाची 'ओली पार्टी'!
पिंपरी-चिंचवड: एसटी आगारात रात्री मुक्कामाला आलेल्या कळंब आगाराचे चालक आणि वाहक पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) वल्लभनगर स्थानक परिसरातच दारू पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. (Vallabhnagar Bus Stand)
सोमवारी (दि. ४) रात्री ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, वैद्यकीय तपासणी अहवालानंतर तक्रार दाखल करून घेण्यात येईल, असे पोलिसांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. संबंधित चालक-वाहकांवर कारवाईचा प्रस्ताव एसटी प्रशासनाकडून धाराशिव विभाग आगाराला पाठवण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभागाचे वाहतूक अधीक्षक कैलास पाटील हे वल्लभनगर एसटी आगारात भेट देण्यासाठी सोमवारी आले होते. आगारात सध्या काम सुरू असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी ते परिसराची पाहणी करत होते. दरम्यान, एसटीचे वाहक-चालक विश्रांती गृहानजीक काही कर्मचारी त्यांना दृष्टीस पडले. या घटनेची माहिती तत्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली.
पिंपरी पोलीस ठाण्याचे (Pimpri Police Station) सहायक उपनिरीक्षक संजय नायडू हे घटनास्थळी कर्मचाऱ्यांबरोबर दाखल झाले. त्यानुसार येथे असलेल्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना तातडीने तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, एसटीच्या धाराशिव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. धाराशिव आगारामार्फत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना पुणे विभाग नियंत्रक कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. (ST Bus News)
चौघा कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे घेतले नमुने
कळंब एसटी आगाराचे वाहक व चालक रविकांत शिंदे, बाळू खटावकार, शंकर बारकुले, बाबुराव मस्के या सर्वांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेऊन ते वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आगाराच्या माध्यमातून कारवाई करण्याबाबत पत्र पोलिसांकडे प्राप्त झाले आहे. तूर्तास त्यांना समजपत्र देऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत सांगून, सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप देशमुख यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.
विश्रांतीगृहाची केली जाते नासधूस
पिंपरी-चिंचवड वल्लभनगर येथील आगारामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून चालक-वाहक विश्रांतीसाठी येत असतात. त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारची सोय आगाराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, बाहेरील चालक दारू पिऊन विश्रांतीगृहाचे नासधूस करतात. यापूर्वी अनेकदा वाहक व चालकांना तंबी देण्यात आली आहे. मात्र, आता खुद्द एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच या कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडल्याने त्यांच्यावर काय कारवाई होते, याबाबत उत्सुकता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.