Pimpri Chinchwad News: प्रवासी दिनाकडे नागरिकांची पाठ

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. सूचना, तक्रारी, हरकती यासह बसमध्ये सुधारणा करण्याबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रवासी दिनाचे आयोजन केले होते.

संग्रहित छायाचित्र

पीएमपीएमएलच्या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडमधून अत्यल्प प्रतिसाद, तक्रार किंवा सूचना नोंदवण्याची संधी असतानाही शहरातून केवळ एकच सूचना

पंकज खोले

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीची सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. सूचना, तक्रारी,  हरकती यासह बसमध्ये सुधारणा करण्याबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रवासी दिनाचे आयोजन केले होते. तीन आगार मिळून केवळ एकच सूचना प्राप्त झाली आहे. (Pimpri Chinchwad News)

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) संचलन कार्यक्षेत्रातील विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर व विश्वसनीय बससेवा देण्याच्या दृष्टीने व सेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी/तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याबाबत प्रत्येक आगाराला सूचना करण्यात आल्या होत्या.

शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) 'प्रवासी दिन' पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि पिंपरी (नेहरूनगर) या ठिकाणी हा प्रवासी दिन साजरा करण्यात आला. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्येक डेपोत त्याबाबत नियोजन करण्यात आले होते. बससेवेबाबतच्या प्रवाशांच्या तक्रारी या वेळेत घेण्यात येणार होत्या. 'प्रवासी दिना'निमित्त प्रत्येक डेपोसाठी नेमणूक केलेले पालक अधिकारी यावेळी प्रत्येक डेपोमध्ये उपस्थित राहिले होते. तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे, वेळेअभावी डेपोमध्ये येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत, असे यावेळी आवाहन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरात वाढती लोकसंख्या व उपनगरे यामानाने बससंख्या तोकडी आहे. त्याचप्रमाणे अनेक मार्गावर वारंवारिता आणि बीआरटी मार्गही बससंख्येअभावी सक्षम नाहीत. अपुरे  बस थांबे, खिळखिळ्या व नादुरुस्त बस, अपघात, ब्रेक डाऊन अशा असंख्य तक्रारी असूनही, एकाही प्रवाशांनी याबाबत डेपोमध्ये आपले म्हणणे सादर केले नाही. शहरातील निगडी या एकमेव आगारामध्ये एक सूचना प्राप्त झाली आहे. बससेवा वाढवावी, तसेच प्रवाशांना सेवा द्यावी असे त्यात म्हटले आहे. मात्र, पिंपरी आणि भोसरी या दोन्ही आगारात एकही तक्रार अथवा सूचना प्राप्त झाली नाही.

स्वारगेट आगारात सर्वाधिक सूचना

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण १५ आगार आहेत.  त्यापैकी स्वारगेट आगारात सर्वाधिक म्हणजेच १५ सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या पाठोपाठ भेकराईनगर ४ आणि कात्रज आगारात ५ सूचना आल्या आहेत. तर, एकूण ३ तक्रारींपैकी शेवाळेवाडी आगारामध्ये २ तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.

२३ प्रवाशांनी केली प्रशंसा

पीएमपीएमएल प्रशासनाच्या तक्रारींबरोबरच काही सुखद अनुभवही प्रवाशांनी व्यक्त केले. वाहक व चालक यासोबतच प्रशासनाची प्रशंसा केली आहे. अप्पर/ मार्केट यार्ड या आगारामध्ये ११ जणांनी चांगल्या सेवेचे, नियोजनाचे कौतुक केले आहे. त्या पाठोपाठ कोथरूड, कात्रज, शेवाळेवाडी, स्वारगेट या आगाराचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहवा केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest