थेरगावच्या प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाला गुणवत्ता प्रमाणपत्र
विकास शिंदे
पिंपरी चिंचवड: मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागामधील गुणवत्ता वाढ तसेच मातांना सुरक्षित प्रसुती आणि मातृत्वाचा आनंद घेता यावा यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेसाठी केंद्र शासनाच्या वतीने 'लक्ष्य' (Lakshya Program) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातील (Thergaon Hospital) प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला केंद्रस्तरीय पथकाने नोव्हेंबर २०२३ रोजी भेट देऊन परीक्षण केलेले होते. त्याअनुषंगाने नवीन थेरगाव रुग्णालय येथील प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाला केंद्र शासनाच्या 'लक्ष्य' या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
केंद्र शासनाद्वारे 'प्रसुतीगृह गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम-लक्ष्य' राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्णालयामधील प्रसुतीगृह व शस्त्रक्रिया गृह यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याचा मानस आहे, जेणेकरुन गरोदर माता, प्रसुत माता व नवजात शिशु यांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या दर्जामध्ये सुधारणा होणार आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)
प्रसूतीचा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव प्रत्येक गर्भवती महिलेला मिळावा अशी तिची आणि तिच्या कुटुंबाची इच्छा असते. यासाठी देशातील मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने 'लक्ष्य' (लेबर रूम क्वालिटी इम्प्रोव्हमेंट : इनिशिएटीव्ह) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये इत्यादी रुग्णालयातील प्रसुतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी तसेच प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक आणि उच्च दर्जाची मातृत्व काळजी प्रदान केली जावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाकरिता केंद्र शासनाच्या 'लक्ष्य' या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयास (प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाकरिता) १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आणि ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे, आकुर्डी रुग्णालयातील प्रसूती कक्षाकरिता १६ मे २०२३ रोजी यापूर्वी प्राप्त झालेले आहे. तसेच ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे, आकुर्डी रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाकरिता राज्यस्तरीय परीक्षण २० डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण झालेले असून राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यवाही चालू आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासन यांचेकडील 'लक्ष्य' या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि नवीन थेरगाव रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.