Pimpri Chinchwad News: पिंपरी ते निगडी मेट्रोचे झाले भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचीही हजेरी

विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) ते निगडी मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. (Pimpri to Nigdi Metro)

या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. तर पिंपरी येथील मेट्रो स्टेशन येथे खासदार श्रीरंग बारणे, आमदार आण्णा बनसोडे,  महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून ५ फेब्रुवारी २०२४ रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते सिविल कोर्ट  ६.९१ किलोमीटर  आणि गरवारे ते रुबी क्लिनिक ४.७५ किलोमीटर अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते

बुधवारी रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) ते रामवाडी (Ramwadi) या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.  हा मार्ग ४.४ किलोमीटरचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे. स्वारगेट ते पिंपरी या मार्गीकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरीपर्यंत आली मात्र ती निगडीपर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रो कडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली.

पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान  ४.४ किलोमीटर अंतरावर चिंचवड स्टेशन (महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान), आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान) अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. पुणे शहरात रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा मेट्रो मार्ग बुधवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशनच्या पुढे बंडगार्डन, कल्याणी नगर रामवाडी ही तीन मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. तर येरवडा मेट्रो स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते, आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे.  - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. आज लोकार्पण झालेल्या रुबी हॉल क्लिनीक ते रामवाडी मेट्रो मार्गामुळे वनाज ते रामवाडी हा मेट्रो प्रवास अधिक सुलभ होईल. पिंपरी-चिंचवड ते निगडी टप्पा 1 मार्गाचे काम सुरू होत असल्याने भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरालाही याचा फायदा होणार आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest