संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे:
मोरवाडी न्यायालय इमारतीच्या मागील बाजूला मोकळ्या जागेत औद्योगिक कचऱ्याला आग लागली होती. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यामुळे परिसरात धूर पसरून प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावरून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने वायुप्रदूषणास कारणीभूत ठरल्याने अमृतेश्वर ट्रस्टला तब्बल १० लाखांची नोटीस बजावली आहे.
मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीमागील अमृतेश्वर सोसायटीजवळ २१ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रचंड मोठी आग लागली होती. तेथील मोकळ्या जागेवर रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले होते. टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली होती. ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोटदेखील झाला होता. त्या मैदानात अनधिकृतपणे औद्योगिक कचरा टाकून साठा तयार केला होता. या कचऱ्याला आग लागून दोन दिवस धुमसत होती. धुराचे लोट सर्वत्र पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मासुळकर कॉलनी, अजमेरा, एम्पायर इस्टेट, ऑटो क्लस्टर आणि मोरवाडीमध्ये प्रचंड धुराचे लोट पसरले होते.
आग आटोक्यात आणण्यासाठी १३ अग्निशमन बंब अपुरे पडले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माती टाकून यश आले. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी लागलेल्या आगीस कारणीभूत ठरल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने अमृतेश्वर ट्रस्टला कायदेशीर नोटीस दिली आहे. तसेच १० लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.