संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन प्रक्रिया सुधारण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून केंद्रिकृत डेटाची अनुपस्थिती, संसाधनांचे अकार्यक्षम वाटप आणि रस्तादुरुस्तीबाबतचे निर्णय यासारख्या अनेक वर्षांपासून शहरी रस्ते व्यवस्थापनामध्ये भेडसावणाऱ्या गंभीर आव्हानांना प्रणालीद्वारे मार्ग काढण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांच्या मालमत्तेबाबतची एकत्रित माहिती नसणे ही महत्त्वपूर्ण समस्या आहे. माहितीच्या अभावामुळे नियोजनामध्ये कमतरता निर्माण होताता. रस्त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी कोणतीही रस्ता ओळख प्रणाली नसल्याने पायाभूत सुविधांचा मागोवा घेणे व त्यांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक बनले आहे. रस्त्यांची देखभाल करण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या आल्याने त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांचे असमान वितरण होते. यामुळे शहरातील काही भागात रस्तादेखभालीचे सुव्यवस्थित काम सुरू असताना काही भाग दुर्लक्षित राहत आहे. अनावश्यक खर्च व दुय्यम सेवा मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
... 'अशी' आहे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस)!
रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस) या प्रकल्पाद्वारे 'जीआयएस'द्वारे एक केंद्रिकृत व्यासपीठ तयार करून रस्ता देखभाल करण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपाय सुचविण्यात येतात. याद्वारे रस्ते व संबंधित पायाभूत सुविधांवर तपशीलवार सदैव रोजची वास्तविक माहिती देण्यात येते. या माहितीच्या आधारे वास्तविक रस्त्यांची परिस्थिती, रस्तादेखभालीसाठी घेतलेले पुढाकार व त्यांचा इतिहास व रस्ता मालमत्तेचे तपशील यामध्ये खांब, पथदिवे यांचा समावेश आहे. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे माहिती संकलित करण्यासाठी व सध्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांनी सुसज्ज जीपीएस - सक्षम वाहने तयार करण्यात आली आहेत. या प्रणालीमध्ये आधुनिक व प्रगत साधनांचा उपयोग करण्यात येत आहे.
... 'अशी' आहेत रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीची वैशिष्ट्ये
सर्वसमावेशक माहितीचे संकलन : जीपीएस - सक्षम वाहनांवर आणि उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे वापरून रस्त्यांची यादी, स्थितीचे मूल्यांकन आणि मालमत्तेचे मॅपिंग करण्यात येणार आहे. वैज्ञानिक अंदाजपत्रक : संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी मोजमाप करण्यायोग्य निकषांवर देखरेखीच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.
प्रतिबंधात्मक देखभाल
रस्ते दीर्घकाल टिकण्यासाठी व त्यावर होणारा दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी सध्या भेडसावणाऱ्या समस्या शोधून दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. जीआयएस द्वारे माहितीचे एकत्रीकरण : केंद्रिकृत प्लॅटफॉर्मवर रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती आणि देखभाल इतिहासाचा रिअल-टाइम ट्रॅकिंग करण्यात येईल.
मान्सूननंतरची सर्वेक्षणे
अर्थसंकल्पाद्वारे खर्चाचे सुनियोजित वाटप करण्यासाठी वार्षिक तपासणी करण्यात येईल.
स्मार्ट गव्हर्नन्स
अनावश्यकता टाळण्यासाठी व जबाबदारी सुधारण्यासाठी महापालिकेच्या वर्क मॅनेजमेंट सिस्टीमशी रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीला जोडण्यात येणार आहे.
जीआयएस आधारित रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस) आम्हाला रस्ता देखभाल करण्यासाठी आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करते. याद्वारे संसाधनाचा कार्यक्षमतेने वापर करण्यात येऊन संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये देखभालीमध्ये समानता आणली जात आहे. सध्या भेडसावणाऱ्या समस्या मोठ्या होण्यापूर्वीच प्रणालीद्वारे त्या ओळखण्यात येतात व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात आल्याने रस्ता दुरुस्तीवर होणारा दीर्घकालीन खर्च कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. त्याबरोबरच, रस्त्यांच्या स्थितीच्या मूल्यांकनासाठी अर्थसंकल्पामध्ये प्रभावी नियोजनासाठी पावसाळ्यानंतर सर्वेक्षणाचा समावेश आहे. याबरोबरच, महापालिकेच्या वर्क मॅनेजमेंट सिस्टीमशी प्रकल्पाला जोडून अधिक व्यवस्थित प्रक्रिया सुनिश्चित करुन दुरुस्तीमधील अनावश्यकता दूर करण्यात येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड
रस्ता मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस) हा प्रकल्प केवळ देखभालीचे साधन नसून पिंपरी-चिंचवडच्या भविष्यासाठी करण्यात आलेली धोरणात्मक गुंतवणूक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही प्रतिक्रियात्मकतेपासून प्रतिबंधात्मक देखभालीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी विविध संसाधनांचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा पुरवित आहोत.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.