जिजाऊ उद्यानाला विक्रेत्यांचा विळखा!
पंकज खोले -
पिंपळे गुरव: शहरातील उद्याने व परिसर सुस्थितीत ठेवणे महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र बहुतांश उद्याने दुर्लक्षामुळे समस्येच्या विळख्यात अडकली आहेत. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराला विक्रेत्यांचा गराडा पडला आहे. हा प्रकार शहरातील सर्वच उद्यानात दिसून येतो. त्यामुळे उद्यानाचे विद्रूपीकरण वाढत असून, विक्रेत्यांमुळे प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात उद्यानात येत आहे. महापालिकेच्या उद्यान व अतिक्रमण विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात सकाळी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. येथे ओपन जिम उभारली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले उद्यानात येतात. मात्र, उद्यानात पाऊल ठेवण्याच्या अगोदर विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. उद्यानाच्या दरवाजासमोर दुचाकी पार्किंगची सोय केलेली आहे. येथील दुचाकी पार्किंग खचाखच भरल्याने यातूनच वाट काढत नागरिकांना जावे लागते
दरवाज्यातच सुगंधी अगरबत्ती, नारळ, कडुलिंब, कारले आदी ज्यूस विकणारे विक्रेते तसेच हर्बल टी विकणारे सकाळी ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात बाधा येत आहे. तसेच, त्याचा कचरा, टाकाऊ पदार्थ आणि प्लास्टिक विनाकारण उद्यानात येत असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे उद्यानासमोर पाणीपुरी, खेळणी विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात. नागरिकांची वाहने पार्किंग करण्याच्या जागेवर विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्किंग करण्याची वेळ येते.
याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, करदात्यांसाठी उपलब्ध असलेल्या या उद्यानाचा विनापरवाना उद्योग व्यवसायासाठी वापर होत आहे. उद्यानाच्या पार्किंगमध्ये हर्बल टी ,अगरबत्ती , नारळवाले, फळ, भाज्यांचे ज्यूस विकणारे आता उद्यानाचे जावई बनले आहेत का, असा जळजळीत प्रश्न मॉर्निंग वॉकसाठी दहा वर्षांपासून येत असलेले सामाजिक कार्यकर्ते नरेश जगताप यांनी पालिकेच्या उद्यान विभागाला प्रश्न केला आहे.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, आम्ही पहाटे पाच वाजल्यापासून उद्यानात येत असतो उद्यान विभागाने असा दुजाभाव करू नये. कोणालाही पार्किंगमध्ये खाद्यपदार्थ असोत, हर्बल टी असो किंवा नारळ विक्रेते असो त्यांना तेथे विक्रीची परवानगी देऊ नये. अन्यथा बाहेर रस्त्यावर प्रामाणिकपणे विक्री करणाऱ्यांनाही तेथे विक्री करण्याची परवानगी द्यावी.
ज्ञानेश्वर वाढेकर म्हणाले की, भल्या सकाळी व्यायाम करण्यासाठी उद्यानात आल्यावर बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच हुल्लडबाज, चाळे करणारे तरुण-तरुणी येथे दिसतात. त्यामुळे सकाळी उद्यानात येण्याचा उत्साह मावळून जातो. याबाबत, महापालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक राजेश वसावे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
खेळणी दुरुस्त करावी
शहरातील बहुतांश उद्यानातील खेळणी नादुरुस्त आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांना खेळण्यासाठी उद्यानाचा वापर होतो. मात्र अनेक ठिकाणी खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. ही खेळणी धोकादायक ठरू शकतात. तुटलेल्या खेळण्यांचे अवशेष उद्यानाच्या कोपऱ्यात पडले आहेत. त्या तुटलेल्या खेळण्यांवर लहान मुले खेळू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांपूर्वी खेळणी दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.