संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: पवना, इंद्रायणी या नद्या वारंवार फेसाळत आहेत. नदीवर बर्फासारखा फेस तयार होत आहे. नदी अतिप्रदूषित होत असून नदी सुधार प्रकल्प कागदावर रखडला आहे. पवना, इंद्रायणी नदीच्या उगमापासून विविध कंपन्या, नगरपरिषदा, महापालिकेचे सांडपाणी, केमिकल आणि रसायनयुक्त पाणी नदीपात्रात थेट मिसळत आहे. त्यानुसार पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावर उद्योगमंत्र्यांनी आयोजित केलेली बैठक अचानक रद्द केली. त्यामुळे पवना, इंद्रायणी फेसाळली काय? की अतिप्रदूषित झाली काय? उद्योगमंत्र्यांकडे त्यासाठी वेळ नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे वारक-यांसह पर्यावरणप्रेमी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Pimpri Chinchwad News)
पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महापालिकेच्या स्थायी सभागृहात आज (रविवार दि. १८) रोजी दुपारी ३.३० वाजता खासदार, आमदार, पुणे, पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यासह पर्यावरण व एमपीसीबी अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. त्यानुसार सर्व विभागाचे अधिकारी वेळेवर बैठकीला उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोशीतील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीची पहाणी करत आढावा घेतला. त्यानंतर ते पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांचा आढावा घेणार होते.
याप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, गणेश निबे, किशोर धारिया, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.
वारक-यांचे श्रध्दास्थान असलेली इंद्रायणी आणि पिंपरी चिंचवड शहराची वरदायिनी असलेली पवनामाई या नद्या अतिप्रदूषित झालेल्या आहेत. पवना नदीचे पाणी सुमारे ३० लाख पिंपरी-चिंचवडकर पितात. त्याच नदीत सांडपाणी, केमिकल, रसायनयुक्त पाणी थेट मिसळत आहे. इंद्रायणी नदीवर तर बर्फाची चादर पसरू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडकर दररोज प्रदूषित पाणी पित आहेत.
त्यानुसार पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावर पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत ही महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. जनतेच्या प्रश्नासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांना वेळ नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरील बैठक अचानक रद्द केल्याने काही पर्यावरण प्रेमी नागरिक, वारक-यांसह अधिकाऱ्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. त्यातच सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उद्योगमंत्र्यांच्या मिटिंगसाठी आले होते. दोन ते अडीच तास वाट पाहून देखील उद्योगमंत्री न आल्याने आजची सुट्टीही गेली आणि मिटिंग पण झाली नसल्याने अधिकारी-कर्मचा-यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
खासदार होते तासभर बसून
पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेदेखील महापालिकेत साडेतीन वाजता आले होते. ते महापालिका आयुक्तांच्या दालनात उद्योगमंत्री उदय सामंत यांची वाट पाहात बसले होते. परंतु, उद्योगमंत्री हे मोशीतील ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन तिथूनच निघून गेले. त्यामुळे खासदार बारणे हे उद्योगमंत्र्यांची वाट पाहून निघून गेले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.