मराठी रंगभूमी दिन, पु. ल. देशपांडे यांची जयंती व दिवाळीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशनच्या वतीने २६ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य उद्घाटन आकुर्डी, प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे मंगळवारी (दि. ५ नोव्हेंबर) मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी दिली आहे.
तत्पूर्वी सोमवारी (४ नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात सायंकाळी ५ वाजता, 'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन, श्रद्धा शिंदे - हर्डीकर यांचा कथक नृत्याविष्कार होणार आहे. बुधवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता स्नेहल सोमण यांचे सामूहिक नृत्यरंग, डॉ. शर्वरी डिग्रजकर - पोफळे यांचे शास्त्रीय गायन, स्वरस्वप्न - व्हायोलिन समूह वादन हे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवारी (दि. ७) समारोपाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकाचे मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले 'मॅड सखाराम' हे विडंबन नाट्य सादर होईल. तसेच डॉ. सुमेधा गाडेकर यांची 'महाराष्ट्राची संत परंपरा' ही नृत्यनाटिका, मिलिंद ओक व राहुल सोलापूरकर यांचा निशे प्रस्तुत 'ब्लॅक अँड व्हाईट' या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने स्वरसागर महोत्सवाची सांगता होणार आहे. .
सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात आयोजित केलेल्या 'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा- पुढे काय ?' या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठभाषा तज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवनी आदी सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजन लाखे हे करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहेत, अशीही माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे व सहसंयोजक राजीव तांबे यांनी दिली.