Pimpri-Chinchwad : इंटरनेट केबलचा तुकडा अन् पक्ष्याची करामत; नाईलाजाचे भारनियमन

महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) मोठ्या पक्ष्याने इंटरनेट केबलचा तुकडा टाकल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 31 Oct 2024
  • 04:08 pm
Pimpri-Chinchwad,Internet cable,voltage ,substation,Rahatni ,Mahapareshan's

पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड परिसरात तासभर वीजपुरवठा विस्कळीत

महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) मोठ्या पक्ष्याने इंटरनेट केबलचा तुकडा टाकल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी पर्यायी वीजपुरवठ्यामध्ये विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्याने पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी, काळेवाडी या परिसरात बुधवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास २० मिनिट ते दीड तासापर्यंत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

याबाबत माहिती अशी की, रहाटणी येथील महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्राला अतिउच्चदाब १३२ केव्ही चिंचवड-रहाटणी वीजवाहिनीद्वारे वीज पुरवठा होतो. मात्र आज सकाळी ७.५६ वाजता रहाटणी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजवाहिनीची पाहणी केली.

यात वाकड येथील वूडस् सोसायटीजवळ या वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन वीजवाहिन्या शॉर्टसर्किटने क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्याचखाली जमिनीवर इंटरनेटच्या केबलचे काही तुकडे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून आले की, एखाद्या मोठ्या पक्ष्याने इंटरनेटच्या केबलचा तुकडा घेऊन या वीजवाहिनीवर बसण्याचा प्रयत्न केला.

यात इंटरनेट केबलच्या तुकड्याचा एकाचवेळी दोन वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले व वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला महापारेषणकडून गणेशखिंड २२० केव्ही उपकेंद्रातून चिंचवड-गणेशखिंड अतिउच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र विजेची मागणी वाढली असल्याने या वीजवाहिनीवर भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या कल्पतरू, रहाटणी, मधुबन, आकाशगंगा व पार्कस्ट्रिट या पाच वीजवाहिन्यांवर नाईलाजाने भारनियमन करावे लागले.

यामुळे सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी व काळेवाडी परिसरात २० मिनिट ते १.३० तासापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यानंतर भारव्यवस्थापनासाठी तांत्रिक उपाययोजना करून रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रातील वीजवाहिन्यांना महापारेषणच्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. महापारेषणकडून नादुरुस्त झालेल्या १३२ केव्ही चिंचवड-रहाटणी वीजवाहिनीचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest