विविध मतदान केंद्रांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली
मतदानाच्या दिवशी मतदारांना सहज व सुलभपणे मतदान करता यावे, तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शहरातील सर्व मतदान केंद्रावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यासह शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने शहरातील तिन्ही मतदार संघातील विविध मतदान केंद्रांची पाहणी आयुक्त शेखर सिंह यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यात कोणतीही अडचण येऊ नये, मतदानाची प्रक्रिया सुलभ व सहजपणे पार पडावी तसेच शहरातील मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्यानुषंगाने शहरातील सर्व मतदान केंद्रावर महापालिकेच्या वतीने आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यामध्ये मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी मतदान केंद्रांवर खुर्च्या व बेंच याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदारांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी जागेवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
तसेच सर्व शाळा व मतदार केंद्रांवरील शौचालये वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या सूचना देखील आयुक्त सिंह यांनी दिल्या. शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, आवश्यक ठिकाणी रॅम्पची सोय करण्यात येणार आहे. वाहनांना पार्किंगची सोय, मतदारांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप उभारणी, दिशा दर्शक फलक लावणे अशा सर्व सोयी सुविधा मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्याबाबतचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदारांना आपले मतदान केंद्र व मतदार यादीतील नाव याबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या ठिकाणी 'नो यूवर पोलींग स्टेशन' हे कक्ष उभारण्यात आले असून त्यासाठी सारथी हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.